ITI Stipend News : आयटीआयमधील प्रशिक्षणार्थीना विद्यावेतनात भरीव वाढ

आता मिळणार दरमहा 500 रुपये

एमपीसी न्यूज – शासकीय आयटीआयमधील प्रशिक्षणार्थीना विद्यावेतनात 40 रुपयांवरुन 500 रुपये अशी भरीव वाढ करण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय आज (शुक्रवारी, दि. 18) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

Maharashtra : 45 वर्ष होऊनही अंमलात न आल्याने महाराष्ट्र कॅसिनो कायदा रद्द

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रशिक्षणार्थ्यांना 1983 पासून 40 रुपये इतके विद्यावेतन शैक्षणिक साहित्याकरीता व इतर आवश्यक खर्चाकरीता देण्यात येते. या विद्यावेतनात मागील 40 वर्षात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.

वाढत्या महागाई दराच्या व शैक्षणिक साहित्याच्या खर्चामध्ये झालेल्या वाढीनुसार विद्यावेतनात वाढ करण्याची मागणी सातत्याने लोकप्रतिनिधी व प्रशिक्षणार्थीकडून करण्यात येत होती.

या निर्णयामुळे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास वर्ग, विशेष मागास प्रवर्ग, अल्पसंख्यांक समाजातील व खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्टया मागास घटकातील प्रशिक्षणार्थ्यांना ज्यांचे वार्षिक उत्पन्न 8 लाखांच्या मर्यादेत आहे.

अशा सर्व प्रवर्गातील प्रशिक्षणार्थ्यांना 2023-24 या शैक्षणिक वर्षापासून दरमहा 500 रूपये इतके विद्यावेतन महाडीबीटी पोर्टलमार्फत देण्यात येईल. याकरीता शासनावर दरवर्षी 75.69 कोटीचा आर्थिक भार पडणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.