Talegaon Dabhade news: राष्ट्रवादी महिला काँग्रेसने मागितली पंतप्रधान मोदी यांच्याकडे भाऊबीजेची ओवाळणी

एमपीसी न्यूज – वाढत चाललेल्या महागाईला आवर घालत खाद्य तेल, डाळ, गॅस सिलेंडर यांच्या किमतीत 50 टक्के सवलत देऊन समस्त गृहिणींना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाऊबीजेची ओवाळणी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.

संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे सत्ताधारी प्रतिनिधी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांच्या मार्फत हे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन पाठवण्यात आले आहे.

यावेळी नगरसेविका वैशाली दाभाडे, नगरसेविका मंगल भेगडे, नगरसेविका संगीता शेळके उपस्थित होत्या. निवेदनात म्हटले आहे की, दिवाळीतील भाऊबीज हा बहीण भावा मधील प्रेमाच्या नात्याची ओळख करून देणारा सण आहे. बहिण भावाला आपल्या भावाला ओवाळल्यानंतर आशीर्वाद देते आणि बहिणीच्या प्रेमाखातर भाऊ आपल्या बहिणीला ओवाळणी देत असतो.

2014 आणि 2019 मध्ये महागाई बेरोजगारी या मुद्द्यावर जेव्हा तुम्ही मतरुपी आशीर्वाद मागायला आमच्या दारात आला होता. तेव्हा समस्त महिला भगिनींनी आपल्याला मतरुपी आशिर्वाद देऊन निवडून दिले होते. पण आज महागाईने “न भुतो न भविष्य” अशा उच्चांक गाठला आहे. हे तुम्हाला दिसत असेल की नाही याबाबतीत शंकाच आहे परंतु आम्हा संसार करणाऱ्या बायकांना हे सर्व दिसते, आज डाळी, खाद्यतेल,घरगूती गॅस सिलेंडर, यांच्या किमती सर्वसामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. त्यामुळे ऐन दिवाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आपल्या आशिर्वादामुळे आमच्यावर संक्रांत आली आहे. त्यामुळे तुम्हाला दिलेल्या मतरुपी आशिर्वादाची ओवाळणी मागायला आम्ही आज एक बहीण म्हणून विनंती करत आहोत असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या प्रेमाची उतराई म्हणून अडचणीत आलेल्या आणि यंदाची दिवाळी या महागाईमुळे कशी साजरी करावी या चिंतेत असलेल्या बहिणींना ओवाळणी म्हणून खाद्यतेल,डाळ, घरगुती गॅस सिलेंडर, अशा अनेक गृहोपयोगी वस्तूंचे भाव आदरणीय. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि आपण दुपटीने वाढवले आहेत ते 50% सवलतीत द्यावेत आणि आमची सर्वांचीच दिवाळी गोड करावी.अशी मागणी या निवेदनातुन करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.