Talegaon Dabhade : वाचनालय समृद्ध करा – निखिल भगत

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) येथील शेजार जेष्ठ नागरिक संघाच्या शेजार वाचनालयात वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक निखिल भगत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आपण सर्वांनी भारतरत्न अब्दुल कलाम यांच्यापासून समाजसेवेची तसेच शिक्षणाची प्रेरणा घ्यायला हवी. शेजार वाचनालय अधिक समृद्ध करण्यासाठी लागणारी सर्व मदत आपण करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.
कार्यक्रमाची सुरुवात अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमासाठी वसंतराव भापकर, निरंजन जहागीरदार उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक निखिल भगत उपस्थित होते.
यानंतर मराठी साहित्य उत्कर्ष मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीकृष्ण मुळे यांनी भारतरत्न ए. पी. जे.अब्दुल कलाम यांचे चरित्र त्यांच्या जीवनातील काही प्रसंग, आठवणी सांगितल्या. तसेच अवकाश संशोधन क्षेत्रात त्यांनी केलेल्या अनमोल कार्याचा थोडक्यात आढावा घेतला. याप्रसंगी वाचनालय प्रमुख उर्मिला बासरकर यांनी वाचनालयाच्या स्थापनेपासून आजपर्यंत झालेल्या प्रगतीचा आढावा घेतला.
शेजार जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष उमाकांत कुलकर्णी यांनी राष्ट्रपती कलाम यांच्या काही आठवणी सांगितल्या आणि प्रमुख पाहुणे निखिल भगत यांचा श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.
स्वागत आणि प्रास्ताविक महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष श्रीकृष्ण पुरंदरे यांनी केले. खजिनदार मधुकर ठकार यांनी आभार मानले. श्रीकृष्ण पुरंदरे, स्मिता गंद्रे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.