Pimpri : व्यवस्थापन शाखेच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू

एमपीसी न्यूज – व्यवस्थापन शाखेच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाची (एमबीए) प्रवेश प्रक्रिया आज (गुरुवार) पासून सुरू झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात एकच प्रवेश प्रक्रिया असून ही प्रक्रिया तंत्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्याकडून करण्यात येते. पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पदव्युत्तर शिक्षणाचे वेगवेगळे पर्याय असतात. त्यातच काही विद्यार्थ्यांनी एमबीए हा देखील एक पर्याय ठेवलेला असतो. मात्र, प्रवेशाची किचकट पद्धत माहिती नसल्याचे बऱ्याचदा गोंधळ उडतो. त्यामुळे संपूर्ण वर्ष वाया जाण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे एमबीए करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची पद्धत (तारखांसह) देत आहोत. 

www.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावरून संपूर्ण प्रवेशप्रक्रिया पूर्ण करता येते. डीटीईच्या संकेतस्थळावर गेल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रथम आपले रजिस्ट्रेशन करावे लागेल. त्यानंतर लॉगीनचा पर्याय वापरून पुढील प्रवेशाची प्रक्रिया करता येईल. एमबीएसाठी फॉर्म भरण्याची मुदत आजपासून (दि. 7) सुरू होत आहे. 21 जून पर्यंत फॉर्म भरता येणार आहेत. फॉर्म भरतानाच विद्यार्थ्यांना आपली शैक्षणिक कागदपत्रे देखील अपलोड करावी लागतील. 

डीटीईकडून 7 ते 21 जून दरम्यान कागदपत्रांची पडताळणी करता येणार आहे. अपलोड केलेल्या कागदपत्रांच्या सत्यप्रती डीटीई ने नेमून दिलेल्या जवळच्या कोणत्याही सुविधा केंद्रावर जाऊन पडताळून घ्याव्यात. त्यानंतर 23 जून 2018 रोजी पहिली गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. कागदपत्र पडताळणी, पहिली गुणवत्ता यादी याबाबत विद्यार्थ्यांना काही अडचण असेल किंवा आक्षेप असेल तर 24 आणि 25 जून रोजी जवळच्या सुविधा केंद्रावर जैन नोंदवता येईल. 

डीटीईकडून 26 जून 2018 रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल. या यादीनुसार विद्यार्थी मिळालेल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊ शकतील. पैसे घेऊन प्रवेश देण्याच्या चुकीच्या पद्धतीला कमी करण्यासाठी तंत्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्याकडून विविध अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. तसेच या विभागाचे सर्व महाविद्यालयांवर नियंत्रण असते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.