Vallabhnagar News : वल्लभनगर एसटीबस स्थानकात जागोजागी अस्वच्छता, तृतीयपंथीयांसाठीचे स्वच्छतागृह बंद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडमधील प्रमुख असलेल्या वल्लभनगर एसटी बसस्थानकात जागोजागी अस्वच्छतेचे साम्राज्य आहे. तेथील शैचालय, मुतारी अस्वच्छ आहेत. तसेच, जागोजागी ‘पिचाकरी’ बहाद्दरांनी गुटखा खाऊन भिंती रंगवल्य़ा आहेत. याशिवाय तृतीयपंथीयांसाठी असलेले स्वच्छतागृह कुलूप लावून बंद ठेवण्यात आले आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बसस्थानकावरील अस्वच्छता प्रवाशांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.

पिंपरी-चिंचवडमधील वल्लभनगर एसटी बसस्थानकावरून विविध जिल्ह्यात प्रवाशांची ये-जा सुरू असते त्यामुळे येथे नेहमीच नागरिकांची वर्दळ पहायला मिळते. पण, बस्थानकात प्रवेश करताच ठिकठिकाणी पडलेल्या खड्यांचे दर्शन होते. याशिवाय शैचालय आणि मुतारीत अस्वच्छतेचे साम्राज्य आहे. नळातून कायम पाण्याचा प्रवाह सुरू असून पाण्याचा अपव्यय होत आहे. बस्थानकात असलेली पाणपोई बंद असून त्याच्या अजूबाजूला घाण जमा झाल्याचे दिसून आले.

दिव्यांगासाठी बनवलेल्या ट्रॅकवर प्रवेशद्वारावर कायम पाणी पडत असल्याने हा ट्रक निसरडा झाला आहे. यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्वच्छतागृहाच्या समोर असलेल्या ‘स्नॅक्स बार’ बंद असून त्याची दुरावस्था झाली आहे. तसेच, बसस्थानकात जागोजागी ठेवण्यात आलेल्या कचराकुंडीच्या खाली गुटखा थुंकून घाण केली आहे. याशिवाय तृतीयपंथीयांसाठी असलेलं स्वच्छतागृह कुलूप लावून बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे तृतीयपंथी प्रवाशांची गैरसोय होत आहे.

याबाबत वल्लभनगर आगार प्रमुखांना संपर्क केला असता प्रतिसाद मिळाला नाही.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.