Wakad : वाकडमध्ये एकाच दिवशी तीन आत्महत्या; पोलिसांच्या सतर्कतेमुळे चौथी आत्महत्या टळली

Wakad: Three suicides on the same day in Wakad; A fourth suicide was averted due to police vigilance

एमपीसी न्यूज – वाकड परिसरात एकाच दिवशी वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन जणांनी आत्महत्या केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. तर पोलिसांच्या सतर्कतेमुळे आत्महत्या करणाऱ्या चौथ्या व्यक्तीला वाचविण्यात पोलिसांना यश आले आहे.
पहिल्या घटनेत प्रशांत नरेंद्र सेठ (वय 32, रा. कॅप्रेसिया सोसायटी, वाकड) या आयटी अभियंत्याने आत्महत्या केली. मयत प्रशांत सेठ हे मूळचे मध्यप्रदेश येथील इंदोरचे रहिवासी आहेत. ते मागील काही वर्षांपासून वाकडमध्ये राहत आहेत. प्रशांत हे हिंजवडी येथील ‘टाटा टेक्नॉलॉजी’ या कंपनीत नोकरी करीत होते. दरम्यान, गुरुवारी दुपारी त्यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
दुसऱ्या घटनेत तनिका शर्मा (वय 31, रा.  रॉयल राधिका ग्रीन अपार्टमेंट, काळेवाडी, रहाटणी. मूळ रा. दिल्ली) या महिलेने आत्महत्या केली. मयत तनिका यांना चार वर्षांचा मुलगा आहे. आपल्या मुलासोबत त्या काळेवाडी फाटा येथील  रॉयल राधिका ग्रीन अपार्टमेंट मध्ये राहत होत्या. गुरुवारी दुपारी तनिका आणि त्यांचा चार वर्षांचा मुलगा असे दोघेजण घरी होते. तनिका यांनी त्यांच्या फ्लॅटच्या गॅलरीमधून उडी मारून आत्महत्या केली. तनिका यांचे सर्व कुटुंबीय आणि नातेवाईक दिल्ली येथे आहेत.

तिसऱ्या घटनेत गेनदेव बाबुराव काशीद (वय 40) या व्यक्तीने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. मयत गेनदेव हे एका खासगी कंपनीत नोकरी करीत होते. त्यांना एक मुलगा आहे. त्यांची पत्नी बुधवारी गावी गेली होती. गुरुवारी गेनदेव यांनी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली.
चौथी घटना गजानन कॉलनी रहाटणी येथे उघडकीस आली. मात्र, या घटनेतील 38 वर्षीय व्यक्तीला वाचविण्यात पोलिसांना यश आले आहे. सिद्धेश्वर अय्यप्पा धनगर (वय 38) असे त्या व्यक्तीचे नाव आहे. सिद्धेश्वर यांची पत्नी मुलाला घेऊन मागील तीन महिन्यांपासून माहेरी गेली आहे. ती परत येत नसल्याने सिद्धेश्वर यांनी गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, सिद्धेश्वर यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून आपण आत्महत्या करीत असल्याची माहिती दिली. नियंत्रण कक्षाने थेरगाव मार्शलला याची माहिती दिली. त्यानुसार पोलीस नाईक बारकुले, पोलीस शिपाई जावेद शेख तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सिद्धेश्वर यांना आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले. सिद्धेश्वर यांचे समुपदेशन करून पोलिसांनी त्यांना त्यांच्या भावाच्या ताब्यात दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.