Vishal Moghe : विदुषी वीणा सहस्त्रबुद्धे स्मृती प्रथम पुरस्काराने युवा गायक विशाल मोघे सन्मानित

एमपीसी न्यूज : कलाकार सर्वांगीण कधी होतो; जेव्हा त्यांच्यामध्ये अनेक गोष्टी भिनलेल्या असतात. गाणे केवळ गळ्यातून येऊन चालत नाही तर त्यात आत्मा असावा लागतो. तो आत्मा सापडेपर्यंत कलाकाराच्या आयुष्याची अनेक वर्षे जातात. परंतु, विदुषी वीणाताई सहस्त्रबुद्धे यांना गाण्यातील आत्मा फार लवकरच्या वयात सापडला. त्यांच्या गाण्यात अप्रतिम उत्स्फूर्तता होती, त्या गाणे उत्तम सजवत असत, त्यामुळे त्यांना रसिकांनी स्वीकारले अशा भावना ज्येष्ठ गायक पंडित सुहास व्यास यांनी व्यक्त केल्या.

सांगीतिक क्षेत्रातील कारकिर्दीसाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने कलानिधी संस्थेतर्फे विदुषी वीणा सहस्त्रबुद्धे स्मृती पहिल्या पुरस्काराने ग्वाल्हेर-आग्रा घराण्याचे युवा गायक विशाल मोघे (Vishal Moghe) यांना आज (दि. 18 सप्टेंबर) सन्मानित करण्यात आले. त्या वेळी पंडित व्यास बोलत होते. विदुषी डॉ. सुधा पटवर्धन, जयपूर-अत्रौली घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे, ग्वाल्हेर घराण्याच्या प्रसिद्ध गायिका अपर्णा गुरव स्वरमंचावर होत्या. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध गायिका आणि संगीतकार विदुषी वीणा सहस्त्रबुद्धे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नाद-निनाद या उपक्रमाअंतर्गत पुरस्काराचे वितरण करण्यात आले. गणेश सभागृह, डीईएस न्यू इंग्लिश स्कूल आवार, टिळक रोड येथे हा कार्यक्रम झाला. सन्मापत्र आणि अकरा हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते. पुरस्कार वितरण सोहळ्याला पुण्यातील प्रसिद्ध गायक, वादक कलावंतांची उपस्थिती होती. प्रसिद्ध तबला वादक मिलिंद गुरव, अपर्णा गुरव आणि प्रणव गुरव यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

पंडित व्यास पुढे म्हणाले, शास्त्रीय संगीताच्या भवितव्याविषयी प्रश्न उपस्थित केले जातात, परंतु युवा पिढी मोठ्या संख्येने शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात येताना दिसत आहे. त्यामुळे भारतीय शास्त्रीय संगीताचे भवितव्य उज्ज्वल आहे, विदुषी वीणाताई सहस्त्रबुद्धे यांच्या स्मृती प्रित्यर्थ प्रदान करण्यात आलेल्या पुरस्काराने (Vishal Moghe) याची नांदी झाली आहे.

विदुषी वीणा सहस्त्रबुद्धे यांच्या स्मृती कायम जपल्या जाव्यात त्याचबरोबर एका युवा कलाकाराला त्याच्या सांगीतिक कारकिर्दीसाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने यंदाच्या वर्षीपासून पुरस्कार दिला जात असल्याचे कलानिधीच्या संस्थापिका अपर्णा गुरव यांनी सांगितले.

पुरस्कार प्राप्त युवा कलाकार विशाल मोघे म्हणाले, ग्वाल्हेर येथे आयोजित तानसेन समारोहात अनेक ज्येष्ठ कलाकारांच्या मैफली ऐकण्याची संधी मिळत होती. विदुषी वीणा सहस्त्रबुद्धे यांचे अनेक राग ऐकले आहेत. त्यांच्या नावे मिळालेल्या पुरस्कारामुळे आनंद झाला आहे. मान्यवरांचे स्वागत अपर्णा गुरव यांनी केले.

पुरस्कार वितरण सोहळ्यापूर्वी विशाल मोघे यांचे गायन झाले. त्यांना हृषिकेश सुरवसे (तबला), प्रवीण कासलिकर (हार्मोनियम), केयूर कुरूलकर, नकुल कुर्णये (तानपुरा) यांनी साथसंगत केली. मोघे यांनी स्वरमैफलीची सुरुवात भीमपलास रागाने केली. गुरू अरुण कशाळकर, शरदचंद्र अरुळकर यांच्या रचनाही त्यांनी सादर केल्या. मैफलीची सांगता डी. व्ही. पलुस्कर यांनी अजरामर केलेल्या ‘जब जानकी नाथ’ या पदाने केली. कलावंतांचा सत्कार समर्पण न्यासाचे दादा जोशी, सोहम उद्योगचे सोहम गरगटे यांच्या हस्ते करण्यात आला. सूत्रसंचालन वीणा गोखले यांनी केले.

PCCOE : स्मार्ट इंडिया हॉकेथॉन राष्ट्रीय स्पर्धेत पीसीसीओईचा प्रथम क्रमांक

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.