Pimpri: आकुर्डीत शनिवारी लोकअदालत; थकित मालमत्ता कराच्या दंडावर मिळणार 90 टक्के सवलत

एमपीसी न्यूज – थकित मालमत्ता कराची प्रकरणे मार्गी लावण्यासाठी न्यायालयाच्या निर्देशानुसार पिंपरी महापालिकेतर्फे येत्या शनिवारी (दि. 13) लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये थकित मालमत्ता कराच्या दंडावर (शास्ती)90 टक्के सवलत देण्यात येणार आहे. लोकअदालती अंतर्गत तडजोडीकरिता 2 हजार 500 थकबाकीदार मालमत्ताधारकांना नोटीस पाठविण्यात आल्या आहेत.

आकुर्डीतील दिवाणी व फौजदारी न्यायालयात शनिवारी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत ही लोकअदालत होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशासनुसार आणि पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशावरुन राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये दिवाणी, फौजदारी आणि तत्सम प्रलंबित तडजोड योग्य प्रकरणे मार्गी लावली जातात. मालमत्ता कर, पाणीपट्टी संबंधातील प्रकरणाचा न्यायालयामार्फत निवाडा करण्यात येतो.

विहित मुदतीत मालमत्ता कराचा भरना न केल्यास महाराष्ट्र महापालिका अधिनियमामधील अनुसूची ‘ड’ प्रकरण 8 मधील नियम 41 नुसार प्रतमिहिना दोन टक्के महापालिका शास्तीकर आकरण्याची तरतूद आहे. थकबाकीदार मालमत्ता धारकांकडून वर्षानुवर्षे मालमत्ता कराचा भरणा होत नाही. त्यामुळे मालमत्ताकराचे थकबाकीदार दिवसें-दिवस वाढत आहेत. अशा प्रकरणांची लोकअदालतीमध्ये तडजोड केली जाणार आहे.

लोकअदाली अंतर्गत तडजोडीकरिता 2 हजार 500 थकबाकीदार मालमत्ताधारकांना नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय लोकअदालतमध्ये तडजोडीअंती थकीत मालमत्ता कराचा एक रकमी भरणा करणा-या मालमत्ता धारकांना महापालिका मालमत्ता कराच्या दंडावर (शास्ती)90 टक्के सवलत देण्यात येणार आहे. त्याव्यतिरिक्त 1 ते 13 जुलै 2019 अखेरपर्यंत थकबाकीसह चालू मागणीच्या मालमत्ताकराचा संपुर्ण भरणा करणा-या मालमत्ताधारकांना दंडावर (शास्ती)90 टक्के सवलत देण्यात येणार आहे. थकीत मालमत्ता कराचा संपुर्ण भरणा करुन सवलत योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महापालिकेच्या कर संकलन विभागाने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.