Pimpri : एमआयटीतर्फे पुरोहितांसाठी ऑनलाइन संस्कृत-शास्त्र अभ्यासक्रम

एमपीसी न्यूज – पौरोहित्य करणाऱ्यांसाठी एमआयटी स्कूल ऑफ वेदिक सायन्सेसतर्फे संस्कृत -शास्त्र हा अभिनव अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. ध्वनिमुद्रित व प्रत्यक्ष ऑनलाईन वर्ग असे या अभ्यासक्रमाचे स्वरुप असून संस्कृत आणि शास्त्राची आवड असणाऱ्या प्रत्येकासाठी हा अभ्याक्रम खुला असणार आहे.

संस्कृत व शास्त्रामध्ये संशोधन करू इच्छिणाऱ्यांसाठी तसेच पौरोहित्याचे सखोल ज्ञान मिळावे या उद्देशाने एमआयटी स्कूल यांच्याकडून संस्कृत व शास्त्र हा अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीने सुरु करण्यात आला आहे. एमआयटी स्कूल ऑफ वेदिक सायन्सेस शाखेकडून घेण्यात येणारा हा अभ्यासक्रम सर्वांसाठी खुला असणार आहे. वेदपाठशाळांतून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढत असताना त्यांचे ज्ञान हे अपूर्ण व एका मर्यादेपलीकडे कमी पडते यासाठी सखोल विश्लेषण करणाऱ्या या अभ्यासक्रमाचे एमआयटी तर्फे आयोजन करण्यात आले आहे.

या माध्यमातून दोन अभ्यासक्रम घेण्यात येणार आहेत ज्यामध्ये संस्कृत प्रवेशिका हा 5 महिने कालावधीच्या अभ्यासक्रमाचे ध्वनिमुद्रित ऑनलाईन वर्ग घेतले जाणार आहेत. या अभ्यासक्रमासाठी संस्कृत भाषेचे व देवनागरी लिपीचे ज्ञान आवश्यक असून 6000 रुपये अभ्यासक्रमाचे शुल्क असणार आहे. तसेच शास्त्र प्रवेशिका हा 4 महिने कालावधीचा अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीनेच राबवण्यात येणार असून 4000 रुपये अभ्यासक्रमाचे शुल्क असणार आहे.

प्रश्न मंजुषा आणि गृहपाठ अशापद्धतीने अभ्यासक्रमाचे मूल्यांकन केले जाणार आहे व अंतिम परीक्षेद्वारे निकाल दिला जाणार आहे. दोन्ही अभ्यासक्रम करू इच्छिणाऱ्यांसाठी 1000 रुपये सवलत दिली जाणार आहे. संस्कृत व शास्त्राचा अभ्यास करू इच्छिणाऱ्यांसाठी याचा फायदा होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.