प्रचाराच्या तोफा थंडावल्या, छुप्या पद्धतीने प्रचार होण्याची शक्यता

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या तसेच जिल्हा परिषदेच्या निवडणुका 21 फेब्रुवारीला होणार आहेत. यासाठी 11 तारखेपासून प्रचाराला सुरुवात झाली होती. त्याची मुदत आज सायंकाळी साडेपाच वाजता संपली. त्यानंतर प्रचाराच्या तोफा थंडावल्याचे चित्र पाहावयास मिळाले. मात्र, पुढील 24 तासामध्ये देखील छुप्या पद्धतीने प्रचार करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता, पुणेकर कोणाच्या हाती सत्ता देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

यंदाची महापालिका निवडणूक प्रभाग पद्धतीने होत असून त्यामध्ये विशेष सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांनी पुणे आणि पिंपरी- चिंचवड शहरावर लक्ष केंद्रीत केले होते. त्या पार्श्वभूमीवर मागील दहा दिवसात पुण्यात सभा आणि रोड शो चा धडाका लावण्यात आला होता. या महापालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता असून त्यांना काही झाले तरी पाय उतार करण्याचे नियोजन सर्व पक्षांनी केले आहे. या निवडणुकीत शहरातील 26 लाख 34 हजार 800 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यातून महापालिकेचे 162 सभासद निवडले जाणार आहे.  त्यासाठी 1 हजार 90 उमेदवार रिंगणात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर 11 तारखेपासून प्रत्येक पक्षामार्फत प्रचार करण्यात येत आहे. 

यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे या नेत्यांच्या सभा आणि रोड शो देखील झाले. काँग्रेस पक्षामार्फत प्रदेशअध्यक्ष अशोक चव्हाण, माज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे, राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये शिवसेना पक्षामार्फत पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची एकमेव सभा आणि इतर नेत्यांची शहरातील विविध भागांमध्ये सभेचे आयोजन केले गेले. 

पुणे शहरात भाजपचे आठ आमदार आणि तीन खासदार आहेत. या भाजपमय भागामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 5 सभा घेण्यात आल्या. मात्र, त्यापैकी एका सभेला श्रोत्यांची गर्दी नसल्याने ही सभा रद्द करावी. या पक्षाकडून संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर, वैंकय्या नायडू, प्रकाश जावडेकर, विनोद तावडे यांच्या सभांचे आयोजन केले होते. तसेच मागील महापालिका निवडणुकीमध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा करिष्मा चालला होता. मनसे महापालिकेतील किंगमेकर ठरला होता. यंदा राज ठाकरे यांनी पुण्यात देखील 1 सभा घेतल्याने सर्व राजकीय पक्ष आणि नागरिकांनी  आश्चर्य व्यक्त केले.

या सभा आणि रोड शो नंतर आजचा शेवटचा प्रचाराचा दिवस असल्याने प्रत्येक राजकीय पक्षातील उमेदवाराने पदयात्रा काढत ढोल ताशा, पथनाट्य, एलईडी स्क्रीन या माध्यमातून नागरिकांमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न केला गेला. यामुळे काही भागामध्ये वाहतूक कोंडीदेखील पाहावयास मिळाली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्रत्येक भागात उमेदवार प्रचार करताना दिसले असून 21 फेब्रुवारीला मतदान केले जाणार आहे. तर 23 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. 

यंदाची पुणे महापालिकेची निवडणूक सर्व राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केली होती. खालच्या पातळीवर जाऊन आरोप प्रत्यारोप झाल्याने या विषयी नागरिकांमध्ये चर्चा ऐकण्यास मिळत आहे. याचा विपरीत परिणाम मतदानावर होणार हे निश्चित मानले जात आहे. मागील दहा दिवसापासून शहरात प्रचार सभांचा धडाका लागला होता. आज पाचनंतर सभा किंवा पदयात्रा नसल्याने पुणे शहरात शांतता पाहावयास मिळत असून जनता कोणाच्या बाजूने कौल देते हे पाहणे जरुरीचे ठरणार आहे. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.