चाकणमध्ये संवेदनशील भागात प्रशासन अलर्ट

एमपीसी न्यूज – जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चाकण परिसरात अनेक ठिकाणी नाकाबंदी सुरू करण्यात आली आहे. मद्य तस्करी आणि पैशांची ने-आण रोखण्यासाठी वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. मतदारांना प्रलोभन ठरतील अशा वस्तुंची व पैशांची वाहतूक रोखण्यासाठी प्रांताधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली खेड तालुक्यात अनेक ठिकाणी चेक नाके उभारण्यात आले आहेत. तसेच भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. 

 

या पथकांनी आतापर्यंत शेकडो वाहनांची तपासणी केली असून संशयास्पद वाहनांवर या पथकाची करडी नजर असल्याचे ठिकठिकाणी पाहावयास मिळत आहे. खेड तालुक्यातील जिल्हा परिषदेचे 7 गट व पंचायत समितीच्या 14 गणांसाठी निवडणूक होत आहे. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रातील  महत्वाच्या ठिकाणावरून मद्य व शस्त्रांची अवैध वाहतूक तसेच मतदारांना प्रलोभन ठरतील अशा वस्तूंची व पैशांची  वाहतूक होऊ शकते हे गृहीत धरून प्रशासन अलर्ट झाले आहे. 

त्यासाठी काही ठिकाणी चेकपोस्ट तयार करण्यात आले आहेत. तर काही ठिकाणी भरारी पथके अचानक अवतरत आहेत. चाकण परिसरातील काही संवेदनशील भागात वाहनांच्या संशयास्पद हालचालींवर विशेष लक्ष ठेवून योग्य ती तपासणी करण्याची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.