‘गिफ्ट’च्या आमिषाने महिलेची चार लाखाची फसवणूक

एमपीसी न्यूज – लंडनहून गिफ्ट पाठवितो असे सांगून ऑनलाईन खात्यावर पैसे टाकायला लावून एका महिलेची चार लाखाची फसवणूक केली. हा प्रकार 17 ते 27 सप्टेंबर दरम्यान घडला.

याप्रकरणी मार्क केली, कस्टम लेडीड याच्यासह नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका 34 वर्षीय महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि मार्क केली यांची फेसबुकवर ओळख झाली होती. मार्क याने फिर्यादी महिलेला लंडनहून गिफ्ट पाठविण्याचे आमिष दाखविले. त्यांचा विश्वास संपादन केला. गिफ्ट पाठविण्यासाठी वेळोवेळी विविध कारणे सांगून बँकामध्ये चार लाख रुपये भरण्यास सांगितले.

पैसे भरूनही गिफ्ट न आल्याने फिर्यादी महिलेने आरोपींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. आरोपी मात्र टाळाटाळ करत होते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसात धाव घेऊन फिर्याद दिली आहे. सांगवी ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) ए.बी. जोंधळे तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.