चिखलीत लोखंडी बीम अंगावर पडल्याने कामगाराचा मृत्यू

मालक आणि ठेकेदाराविरोधात गुन्हा

 

एमपीसी न्यूज – लोखंडी बीमचे पॅकिंग करत असताना बीमचे वजन जास्त झाल्याने पॅकिंग तुटून अंगावर पडल्याने कामगाराचा मृत्यू झाला. याप्रकरणी मालक आणि ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 14 फेब्रुवारीला दुपारी साडेतीनच्या सुमारास चिखली येथे घडली.

अभय बबन सावंत (वय 24, रा. मोरेवस्ती, चिखली), असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी मालक सिद्राम गुंडप्पा सिरुरे (वय 55, रा. निगडी, प्राधिकरण) आणि ठेकेदार चंद्रकांत विलास कणसे (वय 42, रा. तापकीरनगर, काळेवाडी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिद्राम सिरुरे यांचे चिखली येथे हरिओम कोटिंग या नावाने वर्कशॉप आहे. त्यांच्या बांधकाम साईटचे काम सुरू आहे. चंद्रकांत कणसे यांनी कामाचा ठेका घेतला आहे. अभय सावंत हा त्यांच्याकडे मजूर म्हणून काम करत होता. 14 फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास अभय हा लोखंडी बीमचे पॅकिंग करत होता. बीमचे वजन जास्त झाल्यामुळे बीमचे लाकडी पॅकिंग अचानक तुटून त्याच्या अंगावर पडले. त्यात त्याचा मृत्यू झाला.

मालक सिद्राम सिरुरे आणि ठेकेदार चंद्रकांत कणसे यांनी कामगारांच्या सुरक्षिततेची कोणतीच काळजी घेतली नसल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे, पोलिसांनी सांगितले. निगडी ठाण्याचे फौजदार ए. एम. आठरे तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.