तळजाई वस्ती येथे दगडाने ठेचून एकाची निर्घृण हत्या

एमपीसी न्यूज – किरकोळ अपघातानंतर दोन हजार रुपये दिले नाही म्हणून 19 वर्षीय युवकाला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून नेत त्याची दगडाने ठेचून निर्घृन हत्या केली. आज (शनिवारी) तळजाई वसाहत येथे ही घटना उघडकीस आली होती. दरम्यान, पोलिसांनी घटनेचा तपास करत या हत्येप्रकरणी दोघांना अटक  केली.

 

रामवतार बनवारीलाल जताव (वय 19, रा. मोरीपुरा, उत्तरप्रदेश), असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी अक्षय दिवटे (वय 22, रा. शिवदर्शन, पर्वती) व सुमित काळे (वय 21, रा. रविवार पेठ), अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामवतार मूळ उत्तरप्रदेशातील मोरीपुरा येथील आहे. त्याचा चुलत भाऊ पुण्यात आहे. त्याला भेटण्यासाठी तो चार दिवसांपूर्वी पुण्यात आला होता.

 

शनिवारी सायंकाळी आरोपी अक्षय दिवटे व सुमित काळे हे दोघे मद्यधुंद अवस्थेत गंगाधाम परिसरातून दुचाकीने जात होते. त्यावेळी रामवतार तेथून दुचाकीवर जाताना किरकोळ अपघात झाला. अपघातानंतर आरोपींनी दुचाकीचे नुकसान भरपाई म्हणून दोन हजार रुपये मागितले. रामवतारकडे पैसे नसल्याचे सांगितले. त्यावेळी आरोपींनी त्याला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून तळजाई वसाहत येथील शिवाजी मराठा हाऊसिंग सोसायटीच्या मोकळ्या जागेत नेले. तसेच मद्यधुंद अवस्थेत असणार्‍या अक्षय दिवटे व काळे यांनी रामवतार याचा दगडाने ठेचून निर्घृन खून केला व घटनास्थळावरून पसार झाले.

 

असा झाला खुनाचा उलगडा
आरोपींनी पैशासाठी मयताला नातेवाईकांना कॉल करण्यास सांगितले होते. कॉल केल्यानंतर नातेवाईक पैसे आणून देतो म्हणाले होते. मात्र, वेळ लागत असल्याने त्यांनी रामवातरची हत्या केली. त्याच्या नातेवाईकांनी दोन हजार रुपयांसाठी फोन आल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसांनी 8 तासात अज्ञात खुनाचा उलगडा करत आरोपींना अटक केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.