एकविरा देवी गड पायथ्याजवळ जलकुंभांचे भूमिपूजन

एमपीसी न्यूज – श्री एकविरा देवस्थान वेहेरगाव येथे भाविक भक्तांच्या सुविधेकरिता स्वातंत्र पाणीपुरवठा योजने अंतर्गत बांधण्यात येणार्‍या जलकुंभांचे भूमिपूजन शिवसेनेचे सचिव व खासदार अनिल देसाई, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, श्री एकविरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष माजी आमदार अनंत तरे व तहसिलदार जोगेंद्र कट्यारे यांच्या हस्ते करण्यात आले.

 
यावेळी लोणावळा नगरपरिषदेतील शिवसेनेच्या गटनेत्या शादान चौधरी, देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष मदन भोई, सचिव संजय गोविलकर, खजिनदार नवनाथ देशमुख, विश्वस्त काळूराम देशमुख, विलास कुटे, विजय देशमुख, नगरसेवक सुनील इंगूळकर, शिवदास पिल्ले, कल्पना आखाडे, संजय देवकर उपस्थित होते.
 

गुढी पाडव्यापासून कार्ला गडावरील कुलस्वामीनी श्री एकविरा देवीच्या चैत्र यात्रेला सुरुवात होणार आहे. दरवर्षी लाखों भाविक देवीच्या दर्शनासाठी गडावर येत असतात तसेच वर्षभर भाविकांची गडावर दर्शनासाठी गर्दी होत असते. भाविकांना गडावर व परिसरात पिण्याचे शुद्ध व मुबलक पाणी मिळावे. याकरिता स्वतंत्र पाणी योजना व पाण्याची टाकी पार्किंगजवळ आहे.
 
 
मात्र, भाविकांची वाढती संख्या ध्यानात घेता ट्रस्टने नवीन पाण्याची टाकी बांधण्याचे काम सुरू केले आहे. याकरिता राज्यसभा खासदार अनिल देसाई यांनी 15 लाख रुपये व ट्रस्टने दीड लाख रुपयांचा निधी दिला आहे. गडावर व मंदिर परिसरात भाविकांना सुलभ दर्शन मिळावे याकरिता ट्रस्टच्या वतीने विविध सुविधा देण्याचे काम सुरू आहे. मात्र, भारतीय पुरातत्व विभाग व वन विभाग यांच्याकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने विकासकामांत अडथळे येत असल्याची खंत ट्रस्टचे अध्यक्ष अनंत तरे यांनी यावेळी व्यक्त केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.