उंड्री पिसोळी येथे बांधकाम साईटवरील उघड्या डक्टमध्ये पडून कामगार महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज – उंड्री पिसोळी येथील गगन लॅव्हीसा या बांधकाम साईटवरील उघड्या डक्टमध्ये पडून बांधकाम कामगार महिलेचा मृत्यू झाला. ही घटना 17 मार्च रोजी घडली असून याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

नागम्मा सायबन्ना पुजारी असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी गगन लॅव्हीशा बांधकाम साईटचे प्रोजेक्ट मॅनेजर संतोष देशपांडे, सेंट्रीग कॉन्ट्रॅक्टर बाबुराव मोरे आणि लिफ्ट ऑपरेटर शिवाप्पा यशवंत गोडवळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, उंड्री पिसोळी येथील गगन लॅव्हीसा या इमारतीचे बांधकाम सुरु असताना साईटवरील मजूर कामगारांकडून काम करवून घेत असताना त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ती साधनसामग्री पुरवली नाहीत. तसेच उघड्या डक्टवर योग्य ती साधन ठेवण्याची व्यवस्था केली नाही. हा निष्काळजीपणा आणि हलगर्जीपणा केल्यामुळे संबंधीत कामगार महिला त्यात पडून मृत्युमुखी पडली.

सहायक पोलीस निरीक्षक पावसे अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.