‘कीर्तन कथक’ मधून सांगितीक संगमाची विलक्षण अनुभूती


ज्येष्ठ नृत्यांगना गुरु पं. मनिषा साठे आणि राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांची मुलाखत व सादरीकरण

एमपीसी न्यूज – कीर्तन आणि कथक नृत्य या दोन्ही कलांचा रंगमंचावर सादर झालेला विलोभनीय संगम… कीर्तनाच्या माध्यमातून सांगितल्या जाणा-या कथांचे कथक नृत्यरुपात केलेले सादरीकरण… कथकचा उगम कीर्तनातून कशाप्रकारे झाला, याचे सचित्र वर्णन… आध्यात्मिक कीर्तनाला नृत्यरुपी कलेची जोड मिळाल्यावर सादर झालेला अनोखा कलाविष्कार… अशा दोन कलांच्या सांगितीक संगमाची विलक्षण अनुभूती पुणेकरांनी घेतली. कीर्तनाच्या माध्यमातून सांगितलेल्या कथेचा नृत्यरुपी आविष्कार राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे आणि पं. मनीषा साठे यांनी सप्रयोग रसिकांसमोर उलगडून दाखविला.

सूत्रधार तर्फे कोथरूड येथील कर्नाटक हायस्कूलच्या सभागृहात कीर्तन कथक या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कथक नृत्याचा उगम हा कीर्तन कलेतून कशाप्रकारे झाला, हे सप्रयोग दाखविण्यात आले. यावेळी पं. शारंगधर साठे, मदर्स रेसिपीचे अमित कुलकर्णी उपस्थित होते. सूत्रधारच्या मधुरा आफळे, नताशा पूनावाला, वल्लरी आपटे, तोषल गांधी यांनी या दिग्गजांची मुलाखत घेत त्यांच्यासोबत सादरीकरण केले.

कीर्तनाच्या माध्यमातून सांगितल्या जाणा-या कथा ऐकताना त्या नृत्यरुपात समोर आल्यावर कीर्तन आणि कथक कधी एकरुप झाले, हे पाहताना पुणेकर अवाक् झाले. कथक नृत्यातील हावभाव आणि तत्कार यामधून सांगितल्या जाणा-या कथांचा उगम कीर्तन हाच आहे, याचा प्रत्यक्ष अनुभव प्रेक्षकांनी घेतला. हे दोन्ही कलाप्रकार रसिकांनी अनेकदा वेगवेगळ्या स्वरुपात पाहिले असतील. परंतु दोन्ही कला एकत्रितपणे कशाप्रकारे सादर होतील, याची उत्सुकता जमलेल्या प्रत्येकाच्या मनात होती. कीर्तन कथक या दोन्ही कला रंगमंचावर एकत्रितपणे सादर होताना टाळ आणि घुंगरु एकरुप होऊन एक कथा सांगू लागले, यामधून निर्माण झालेला नाद रसिकांच्या अंत:करणाला स्पर्शून गेला आणि नकळतपणे अनेकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.

पं. मनीषा साठे म्हणाल्या, कथक नृत्याची परंपरा कीर्तनाच्या माध्यमातूनच झाली. पूर्वीच्या काळी रामायण, महाभारत अशाप्रकारच्या कथा रसिकांना सांगून प्रबोधन केले जात असे. अशाप्रकारे काही प्रसंग अभिनय रुपात नृत्याद्वारे कथकमधून सांगितले जात होते. कथाकथन हा कथकचा मूळ स्त्रोत आहे. कथक मधील अभिनयातून शब्दार्थ, भावार्थ आणि व्यंजनार्थ या तिन्ही गोष्टी दाखवायच्या असतात. शब्दाप्रमाणे अभिनय झाल्यावर वाक्यानुरुप अभिनय करायचा असतो. त्यामुळे कीर्तनकारांप्रमाणेच नृत्यातूनही कथा अभिनय करून मांडली जाते.

कीर्तनकार चारुदत्त आफळे म्हणाले, कीर्तनामध्ये दोन प्रकार आहेत. पहिली नारदीय कीर्तन परंपरा आणि दुसरी वारकरी कीर्तन परंपरा. वारकरी कीर्तन परंपरेत टाळ, मृदुंग, वीणा एवढ्याच वाद्यांचा समावेश असतो. यामध्ये संतांचा एक अभंग घेऊन तो उलगडून दाखवित समजावून सांगितला जातो. नारदीय कीर्तन परंपरेत संतांचा अभंग घेतला जातो. त्याचे निरुपण केले जाते. अभंग नुसता ऐकून शब्दार्थाने समजत नाही. त्यामागील भावार्थ समजावून द्यावा लागतो. पूर्वीच्या काळात प्रबोधन, मनोरंजन आणि अध्यात्म हे तीन भाग होते. हे सर्व प्रकार एकत्र असणारे शेकडो कलाप्रकार भारतात आहेत. परंतु यातील अध्यात्मिक भागामुळे कीर्तन अधिक काळ टिकून राहिले आहे, असेही ते म्हणाले.

कार्यक्रमात पं. मनीषा साठे यांना मोहनीष जाजू (तबला), लीलाधर चक्रदेव (संवादिनी/गायन) यांनी साथसंगत केली. चारुदत्त आफळे यांना मिलींद तायवडे (तबला), मनोज भांडवलकर (पखावज), रेशीम खेडकर (संवादिनी), वज्रांग आफळे (टाळ) साथसंगत केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.