‘जय गणेश रुग्ण सेवा’ अभियानाचा श्रीगणेशा

शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त गरजू व गरीब रुग्णांकरिता मोफत आरोग्य शिबिरांना प्रारंभ

एमपीसी न्यूज – समाजातील प्रत्येक घटकाकरिता मदतीचा हात देण्याकरिता तत्पर असणा-या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी (125) वर्षानिमित्त आयोजित राज्यस्तरीय जय गणेश रुग्ण सेवा अभियानाचा प्रारंभ झाला. शारीरिक अपंगत्व असलेल्या पुण्यासह महाराष्ट्रातील गरजू रुग्णांना मोफत कृत्रिम हात-पाय व विविध आजारांवरील मोफत तपासण्यांचा लाभ यावेळी नागरिकांनी घेतला.

गणेश कला क्रीडा मंच येथे उद्घाटनप्रसंगी दादा जे.पी.वासवानी फाऊंडेशन इनलॅक्स बुधराणी हॉस्पिटलचे महाव्यवस्थापक सुंदर वासवाणी, ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांसह विश्वस्त उपस्थित होते. अभियानात पुण्यातील नामांकित रुग्णालये व तज्ज्ञ डॉक्टरांचा सहभाग आहे. रविवार, दि 6 ऑगस्टपर्यंत दर रविवारी सकाळी 9 ते दुपारी 2 यावेळेत गरजू व गरीब रुग्णांकरिता मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. 

अपंगांना मोफत कृत्रिम हात व कृत्रिम पाय बसवून देण्याची सुविधा कोरेगाव पार्क येथील इनलॅक्स बुधरानी हॉस्पिटलतर्फे यावेळी उपलब्ध करून देण्यात आली. शिबिरात सोलापूर, उस्मानाबाद, सांगली, तुळजापूरसह पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील पांडुरंग मुंढे, धनंजय पारेकर, सुनंदा नांगरे, इंदू जैन, वैष्णवी निंबाळकर, आप्पाराव सूर्यवंशी, अँथनी शिरसाठ यांसह अनेक गरजू रुग्णांनी सहभाग घेतला. संपूर्ण वर्षभर या रुग्णांना सेवा देण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

ट्रस्टतर्फे रविवार, दि. 23 जुलै रोजी होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉ. संजीव डोळे सर्व आजारांवर रुग्णांना उपचार देणार आहेत. रविवार, दिनांक 30 जुलै रोजी सर्व प्रकारांच्या आजारांवर तपासणी व मोफत शस्त्रक्रिया, उपचार पिंपरी-चिंचवडमधील डी.वाय.पाटील रुग्णालयातर्फे करण्यात येणार आहेत. तसेच रविवार, दिनांक ६ ऑगस्ट रोजी हृदयरोग तज्ज्ञ डॉ. सुनील साठे हे मोफत हृदयरोग तपासणी आणि सर्व प्रकारच्या हृदयशस्त्रक्रिया अँजिओप्लास्टी या सुविधा उपलब्ध करून देणार आहेत. 

पुण्यातील नामांकित रुग्णालयांचा या अभियानात सहभाग असून अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. पराग संचेती हे संचेती हॉस्पिटल येथे मोफत अस्थिरोग तपासणी आणि सवलतीच्या दरात जॉईंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया करणार आहेत. तसेच धनकवडी येथील भारती हॉस्पिटल येथे मोफत अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करून देण्याची सुविधा दि. 5 सप्टेंबरपर्यंत उपलब्ध करून देण्यात आली आहे. ट्रस्टचे डॉ. बाळासाहेब परांजपे हे या अभियानाचे समन्वयक म्हणून काम पाहत असून माहितीकरिता मो. 9881418450 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.