अंध गोपाळांनी फोडली दहीहंडी


मंजुषा नागपूरे यांचा अभिनव उपक्रम

एमपीसी न्यूज – केदार फ्रेंड्स सर्कल, हिंगणे व नगरसेविका मंजुषा नागपूरे यांच्या संयुक्त विद्यमाने सिंहगड रोडवरील हिंगणे खुर्द येथे अंध गोपाळांसाठी दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. किष्किंधा प्रतिष्ठान संचलित अंध वसतीगृहातील 25 अंध विद्यार्थ्यांनी हा आनंद लुटला तर कार्यक्रमाची मुख्य दहीहंडी बारामती गोविंदा पथकाने फोडली.

‘चलो जलाए दीप जहाँ, अब भी अंधेरा हे’ ही संघ संस्काराने दिलेली शिकवण घेऊन अंध विद्यार्थ्यांमध्ये आनंद वाटण्यासाठी, त्यांना आपल्यात सामावून घेण्यासाठी या हंडीचे आयोजन केल्याचे नागपूरे यांनी सांगितले. अंध विद्यार्थ्यांना हंडी फोडण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उमेश चव्हाण तसेच अभिनेते गिरीश परदेशी उपस्थित होते.

चायनीज वस्तू न वापरण्याचे आवाहन आयोजक समीर महाडिक व दीपक नागपूरे यांनी उपस्थितांना केले. विकृत परिस्थितीला फाटा देऊन नवीन आदर्श उपक्रम सुरू केल्याबद्दल आयोजकांचे सर्वांनी कौतुक केले. शिवशार्दूल ढोल ताशा पथकाने दही हंडीला साजेशी साथ दिली. कार्यक्रमाची सांगता सामूहिक शिववंदनाने करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महेश वैद्य, मयूर पांगारे, ओंकार वैरणकर, विशाल अवघडे, संदीप कदम, मंगेश बुजवे आदींनी प्रयत्न केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.