सुदुंबरेत पांडवकालीन सिद्धेश्वर मंदिर पुरातन वास्तुकलेचा सुंदर नमुना


एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील भंडारा डोंगराच्या पायथ्याशी वसलेले तीर्थक्षेत्र सुदुंबरे गावातील श्री सिद्धेश्वर मंदिर पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. हे सिद्धेश्वर मंदिर वास्तुकलेचा सुंदर नमुना म्हणून ओळखले जात आहे.

हे मंदिर सुदुंबरेकर ग्रामस्थांबरोबर आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांचे देखील श्रद्धास्थान आहे. मंदिरातील गर्भ गृहाचे कोरीव काम पाहताना कोणीही थक्क होते. तीन टप्प्यामध्ये असणारे हे मंदिर आपल्या शिल्पकलेमुळे सुदुंबरे गावच्या वैभवात आणि नावलौकिकात भर टाकत आहे.

पहिल्या टप्प्यात नंदी व त्यावर असणारा कळस, दुस-या टप्प्यात गर्भगृह व तिसरा टप्पा गाभारा म्हणून ओळखला जातो. दर्शनी भागात असणारा नंदी पुरातन शिल्पकलेचा सुंदर नमुना आहे. काळ्या पाषाणातील हे कोरीव काम मनाला मोहून टाकते. गर्भगृह गाभा-याला दोन गवाक्षे आहेत, जाळीदार गवाक्षामुळे मंदिरात हवा चांगली खेळती राहते. त्यामुळे मंदिरातील वातावरण नेहमीच प्रसन्न, आल्हादायक व थंड असते.

मंदिराचा मुख्य भाग म्हणजे गाभा-यात बरोबर मध्यभागी शिवलिंग आहे. त्यामागे दोन देवतांची सुबक अशा मूर्ती आहेत. मंदिरासमोर सुमारे 200 वर्षांपूर्वीचा महाकाय पिंपळ वृक्ष असून तो चांगला सुबक दगडी चौथ-यात उभा आहे. श्रावणी सोमवार व महाशिवरात्री  काळात या ठिकाणी पंचक्रोशीतील भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी पाहायला मिळते. मंदिरातील देखभाल गावातील तरुण व ग्रामस्थ मोठ्या सेवाभावीरूपाने करत असतात.
"2

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.