तिसर्‍या विंटेज्‌ करंडक 2017 ट्‌वेंटी-20क्रिकेट स्पर्धेस उद्यापासून सुरुवात

एमपीसी न्यूज – प्रथम स्पोर्टस्‌ मॅनेजमेंट यांच्यातर्फे  तिसर्‍या विंटेज्‌ करंडक 2017 ट्‌वेंटी-20 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवारपासून (दि. 26) पीसीएमसी व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी, पुना क्लब, कटारिया हायस्कुल येथील मैदानावर सुरू होणार आहे. 
 
याविषयी अधिक माहिती देताना प्रथम स्पोर्टस्‌ मॅनेजमेंटचे संचालक अमित जगताप यांनी सांगितले की, स्पर्धेचे हे सलग तिसरे वर्ष असून ही स्पर्धा आयोजित करण्यात आम्हाला आनंद होत आहे. या स्पर्धेद्वारे पुण्यातील कॅार्पोरेट क्षेत्रातील गुणवान व उदयोन्मुख खेळाडूंना आपली गुणवत्ता दाखविण्याची संधी मिळत आहे. अशा संधीमुळेच भविष्यातील खेळाडू घडण्यास मदत होत असल्याचेही अमित जगताप यांनी आवर्जुन सांगितले.
 

स्पर्धेत सिर्नजीप्‌, एल अँड टी इन्फोटेक, आयनॉटिक्स्‌ टेक्नॉलॉजी, यार्डी सॉफ्टवेअर, इव्होसिस्‌ ग्लोबल, आयडियाज्‌, स्प्रिंगर नेचर, मर्क्स्‌, एचएसबीसी, अंश सिस्टिम, एफआयएस ग्लोबल, सिटी कॉर्प, ऍसेंच्युअर, सिमेन्स्‌, झेंसार, कॉग्निझंट या संघांचे सामने होणार आहेत. ही स्पर्धा साखळी व बाद पद्धतीने खेळविण्यात येणार आहे. तसेच, ही स्पर्धा गुलाबी रंगाच्या चेंडूवर खेळविण्यात येणार आहे. 
 
तसेच स्पर्धेतील विजेत्याला करंडक व 51हजार रूपये, तर उपविजेत्याला करंडक व 41हजार रूपये अशी पारितोषिके देण्यात येणार आहे. याशिवाय उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि मालिकावीर यांना आकर्षक पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेतील प्रत्येक सामन्यातील सामनावीराला सन्मानचिन्ह देण्यात येणार असल्याचे जगताप यांनी सांगितले. 
 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.