Pimpri : स्थायी समितीची 34 कोटींच्या विकास कामांना मंजुरी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड स्थायी समितीने शहरातील 34 कोटी 26 लाख रुपयांच्या विविध विकास कामांना मजुरी दिली. तसेच महापालिकेच्या थकीत मिळकत कर वेळेत भरणा-या कर दात्यांसाठी अभय योजनेला देखील मंजुरी देण्यात आली. भोसरी नाट्यगृहातील अग्निशमन रिंग पाईप, काळेवाडी, रहाटणी येथील गुरुत्व वाहिनीची सुधारणा, नवी सांगवी मुख्य जलनि:सारण नलिकामध्ये सुधारणा, संगणक संच खरेदी, सुदर्शन नगर चौक येथे ग्रेड सेपरेटर बांधण्यासाठी आणि हवाई छायाचित्रे विकत घेण्याच्या खर्चास मजुरी देण्यात आली आहे.

स्थायी समिती सभागृहात आज (मंगळवारी) झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या. महापालिकेच्या थकीत मिळकत करावर आकारण्यात आलेला  थकबाकीसह मिळकत कर करदात्यांना एक रक्कमी एक ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर पर्यंत भरल्यास मिळकतधारकांना मनपा कर शास्ती रकमेच्या 90 टक्के सवलत देण्यात येणार आहे. तसेच 16 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर पर्यंत भरणा करणा-या मिळकतधारकांना मनपाकर शास्ती रकमेच्या 75 टक्के सवलत देण्यात येणार आहे. त्यासाठी अभय योजना सुरु करण्यात आली आहे.

भोसरी येथील अंकुशराव लांडगे प्रेक्षागृह इमारतीमधील अग्निशमन यंत्रणेसाठी नविन रिंग मेन पाईप लाईन टाकण्यासाठी 56 लाख 13 हजार रुपये खर्च मंजुरी दिली. काळेवाडी, रहाटणी भागातील पवना नदीच्या बाजूने मुख्य गुरुत्व वाहिनीची सुधारणा विषयक कामे करण्यासाठी 42 लाख 78 हजार रुपयांच्या खर्चासही स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. नवी सांगवी मुख्य जलनि:सारण नलिकामध्ये सुधारणा करण्यासाठी येणा-या सुमारे 49 लाख 73 हजार रुपयांच्या खर्चास मान्यता दिली. महापालिकेच्या विविध विभागांसाठी आवश्यक संगणक संच साहित्य खरेदी करण्यासाठी 25 लाख 48 हजार रुपये मंजूर करण्यात आले.

बीआरटी कॉरीडॉर क्रमांक तीनवर सुदर्शन नगर चौक येथे ग्रेड सेपरेटर (समतल विलगक) बांधण्यासाठी 25 कोटी 73 लाख 56 हजार रुपये मंजूर करण्यात आले. मनपाच्या सर्व विभागांना उपयुक्त ठरणारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील हवाई छायाचित्रे पुणे महानगरपालिका प्रदेश विकास प्राधिकरण यांच्याकडून खरेदी करण्यासाठी 53 लाख 93 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.

झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प व झोपडपट्ट्या यांमधील अनधिकृत नळजोड नियमित करण्यासंबधीचा विषय मा. महापालिका सभेपुढे ठेवणेस स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अंगणवाड्यांच्या भिंती थ्रीडी पेंटिंगद्वारे बोलक्या करण्यासाठी स्थायी समितीने मान्यता दिली असून 14 नोव्हेंबर या दिवशी बालदिनानिमित्त पी.डब्ल्यू.डी. मैदान व भोसरी येथे 13 व 14 नोव्हेंबर रोजी बालजत्रेचे आयोजन करण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महापौर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा, महापौर चषक जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धा, महापौर चषक राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धा आयोजित करणेस स्थायी समिती बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.