Pimpri : आदिवासींच्या हक्कांसाठी लढा देणारे रवींद्र तळपे यांचा भाजपामध्ये प्रवेश

एमपीसी न्यूज – राज्यातील गोरगरीब दुर्बल आदिवासींच्या हक्कांसाठी अनेक वर्षांपासून लढा देणारे कार्यकर्ते रवींद्र तळपे यांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. भाजपाच्या राष्ट्रीय अनुसुचित जमाती मोर्चाचे उपाध्यक्ष खासदार अशोक नेते यांच्या उपस्थितीत, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रा. हरिश्चंद्र भोये महामंत्री तुळशीराम गावित, प्रदेश अनुसूचित जमाती मोर्चाचे संघटन मंत्री कृष्णराव चव्हाण यावेळी उपस्थित होते. तळपे यांची प्रदेश अनुसूचित जमाती मोर्चाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले . भाजपच्या प्रदेश कार्यालयात हा कार्यक्रम झाला .

तळपे यांनी राज्यातील आदिवासींच्या न्याय्य हक्कासाठी सर्वोच्च आणि उच्च न्यायालयात तब्बल 26 जनहित याचिका दाखल केल्या आहेत. भारतीय जनता पार्टीची अनुसुचित जमातीच्या उन्नतीसाठी आखलेली धोरणे समाजाच्या हितासाठी उपयुक्त आहेत,त्यात आणखी काही ठिकाणी सुधारणा करण्याची आवश्यकता आहे त्यासाठी आपण सूचना करणार आहोत असे तळपे यांनी सांगितले. आदिवासी आश्रमशाळा व वसतीगृह सुधारणांसाठी तळपे हे अनेक वर्षांपासून शासकीय दरबारी संघर्ष करीत आहेत . त्याचबरोबर जात पडताळणी प्रमाणपत्र कायद्याच्या कठोर अंमलबजावणीसाठीही त्यांनी लढा दिला आहे .

वैद्यकीय प्रवेशमध्ये आदिवासींच्या नावाने होणारी घुसखोरी ओळखुन त्याला आळा घालण्यासाठी एकाच वेळी तीन-तीन याचिका त्यांनी दाखल केल्या आहेत. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे बळकटीकरण व सुसुत्रीकरण करुन समित्या बळकट करण्यात तसेच पेसाविरोधी आदिवासींच्या जमीन अधिग्रहणाच्या निर्णयांना कायदेशीर आव्हान देण्यात त्यांची भूमिका आदिवासी समाजाला सर्वश्रुत आहे. तळपे यांनी यवतमाळमधील कुमारीमातांच्या पुनर्वसन व इतर समस्यांबाबत विविध उपाययोजना सुचवून आपल्या गरीब भगिनिंना न्याय मिळवून दिला.

भाजपा हा इतर पक्षांपेक्षा वेगळा केडरबेस पक्ष आहे. भाजपा जगातला पहिल्या क्रमांकाचा पक्ष झाला आहे. भाजपाची सभासद संख्या साडेअकरा कोटी आहे. येणाऱ्या काळात काँग्रेसमुक्त भारत होणारच आहे. तळपे यांच्या प्रवेशाने भारतीय जनता पार्टी आदिवासी क्षेत्रात नक्कीच मजबूत होणार आहे, असे खा. नेते यांनी यावेळी सांगितले .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.