Pune : शरद कळसकरला 10 सप्टेंबर पर्यंत सीबीआय कोठडी

दाभोळकर यांच्यावर कळसकरनेच गोळ्या झाडल्या; सरकारी वकिलांचा दावा

एमपीसी न्यूज – डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात शरद कळसकर याला अटक करुन आज दुपारी शिवाजीनगर येथील जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला 10 सप्टेंबरपर्यंत सीबीआय कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणातील अटकेत असलेला आरोपी शरद कळसकर हा दुसरा प्रत्यक्ष मारेकरी असून त्यानेच दाभोळकर यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या आहेत. तसेच तो शस्त्र तयार करण्यात आणि हाताळण्यात पारंगत आहे व शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण देण्यातही तो सहभागी होता असे सांगत आरोपीला 14 दिवसांची सीबीआय कोठडी देण्याची मागणी सीबीआयचे वकील विजयकुमार ढाकणे यांनी न्यायालयात केली होती.

सरकारी वकिलाच्या युक्तिवादाला उत्तर देताना आरोपीचे वकील ऍड धर्मराज यांनी आतापर्यंतच्या तपासात सीबीआयला सचिन अंदुरेच्या 14 दिवसाच्या कोठडीत देखील गुन्ह्यात वापरलेले शस्त्र आणि आणि वाहन हस्तगत करता आले नाही. त्यामुळे कळसकरला न्यायालयीन कोठडीत पाठवावे, अशी मागणी केली.

दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश सय्यद यांनी शरद कळसकर याला 10 सप्टेंबरपर्यत सीबीआय कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.