Talegaon Dabhade : तहसील कार्यालयासमोर गीता विद्यानिकेतन स्कूलचे पालक, पदाधिकारी यांचे आजपासून बेमुदत उपोषण

एमपीसी न्यूज- अगरवाल विद्याप्रसारक मंडळ संचलित जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर सोमाटणे फाट्यानजीक असलेल्या गीता विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूलच्या हद्दीतील डोंगर उतारावर कोणतेही अनधिकृत गौण खनिज उत्खनन केले नसतानाही मावळ तहसील कार्यालयाकडून दंड आणि व्याजापोटी सुमारे 18 लाख रुपये भरण्याबाबत नोटीस देण्यात आलेली आहे.  ही कारवाई चुकीची आणि अन्यायकारक असून तहसील कार्यालयाकडून संस्थेवर होत असलेल्या अन्यायकारक कारवाईच्या विरोधात आज, शुक्रवारपासून विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसमवेत मावळ तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा संस्थेचे सचिव जयभगवान गोयल (अगरवाल) यांनी पत्रकार परिषदेत दिला.

गोयल म्हणाले, ” माझी जयभगवान टीकाराम गोयल नावाने सोमाटणे फाटा येथे गट नंबर 333 ही अकृषी (एन ए) जागा आहे. शाळा व महाविद्यालय सुरु करण्यासाठी डिसेंबर 2005 आणि जानेवारी 2006 मध्ये रजिस्टर खरेदी खताद्वारे जागा खरेदी केली आहे. शाळेची इमारत बांधण्याकरता व खेळाचे मैदान विकसित करण्याच्या उद्देशाने संस्थेने सर्व शासकीय पातळीवर पत्रव्यवहार केला. मैदान सपाटीकरणासाठी महसूल विभागाकडून रितसर परवानगीही घेण्यात आली..मैदानाच्या सपाटीकरणापोटी दोन वेळा रॉयल्टीच्या रूपाने रीतसर फी भरली आहे. संस्थेच्या वतीने या ठिकाणी जागेचे फक्त सपाटीकरण केले असून तेथील एक इंचही माती उकरून बाहेर नेलेली नाही. असे असताना महसूल विभागाच्या वतीने सन 2010 साली चुकीचा पंचनामा करण्यात आला” संस्थाचालकांच्या अनुपस्थित कोणीतरी येऊन उत्खनन केल्याचा पंचनामा केला असल्याचा आरोप यावेळी गोयल यांनी केला.

अलिकडे जागेचा नवीन सातबारा उतारा काढला असता त्यावर संस्थेचे नाव कमी करून महाराष्ट्र शासन अशी नोंद केली आहे. दरम्यान, उत्खनन केले नसताना दंड का भरायचा, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. सदर दंड म्हणजे स्थानिक अधिकाऱ्यांची खंडणी मागण्याची एक पद्धतच आहे, असा घणाघाती आरोप त्यांनी केला.

जागेची प्रत्यक्ष पाहणी करून खातरजमा करावी, जागेच्या सातबारावरील बोजा कमी करावा, संस्थेचे आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे आदी मागण्यांसाठी उपोषण करणार असून तसा पत्रव्यवहार पंतप्रधान, मुख्यमंत्री, पालकमंत्री आणि शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केल्याची माहिती अगरवाल यांनी दिली. यावेळी प्राचार्य एस.व्ही.निंबाळकर उपस्थित होते.

याबाबत मावळचे तहसीलदार रणजित देसाई यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, गीता विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल संदर्भातील जयभगवान गोयल यांनी उपस्थित केलेला विषय हा जुना असून गौण खनिजाचे अनधिकृत उत्खनन झाले असेल म्हणूनच तत्कालीन तहसीलदारांनी दंड बजावला असणार. रीतसर नोटिसा पाठवूनही दंड भरला नाही म्हणून आता सदर मालमत्ता सरकार जमा करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ही कारवाई  गोयल यांना चुकीची आणि अन्यायकारक वाटत असेल तर त्यांनी प्रांताधिकाऱ्यांकडे अपील करावे. वरिष्ठांकडे दाद न मागता उपोषणाचा इशारा देणे हा यावरील उपाय नाही. अनधिकृत गौण खनिजाच्या दंडाबद्दल दखल न घेतल्याने मावळातील काही मालमत्ता शासनदरबारी जमा करण्यात आल्या आहेत, असेही रणजित देसाई यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.