Chinchwad : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील 32 अधिकारी अनधिकृतपणे कार्यरत; पोलीस अधिका-यांच्या नावाची यादी व्हायरल

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या अधिका-यांपैकी 32 पोलीस अधिकारी अनधिकृतपणे कार्यरत आहेत. याबाबतची यादी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ही यादी पुणे पोलीस आयुक्तालयाकडून पोलीस महासंचालकांना पाठविण्यात आली असल्याची चर्चा सुरू आहे. यादीतील सत्य नेमके काय हा जरी प्रश्न असला तरी यानिमित्ताने पुन्हा एकदा पुणे पोलीस आयुक्तालय आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय असा वाद समोर आला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची गरज ओळखून 15 ऑगस्ट 2018 रोजी पुणे शहर पोलीस आयुक्तालयातून पिंपरी-चिंचवड हे नवीन पोलीस आयुक्तालय सुरु करण्यात आले. सुरुवातीपासूनच पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाला असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे. मनुष्यबळाची कमतरता असल्याची बाब पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन वेळोवेळी अति वरिष्ठ अधिकारी आणि राजकीय नेत्यांपुढे मांडत आहेत. पण त्यावर सगळीकडूनच होकारार्थी मान हलविली जाते. मात्र कोणतीही अंमलबजावणी केली जात नाही.

वाहनांच्या बाबतीत देखील हाच पेच पिंपरी चिंचवड आयुक्तालयापुढे आहे. यांसाख्या अनेक बाबी आहेत, ज्याची वरिष्ठ पातळीवर कोणतीही दखल घेतली जात नाही. त्यातच पुणे आयुक्तालयाने पोलीस महासंचालकांना पिंपरी चिंचवड आयुक्तालयात अनधिकृतपणे कार्यरत असलेल्या पोलीस अधिका-यांची यादी पाठवली आहे. यामध्ये एक पोलीस निरीक्षक, 23 सहाय्यक पोलीस निरीक्षक तर 8 पोलीस उपनिरीक्षक अनधिकृतपणे कार्यरत असल्याचं सांगण्यात आलं आहे. पुणे पोलीस आयुक्त कार्यालयामधून पिंपरी चिंचवड आयुक्त कार्यालयामध्ये नेमणुकीला आलेले 32 पोलीस अधिकारी या पत्रामुळे मात्र धास्तावले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.