Pimpri : जनताच त्यांचा ‘बळीचा बकरा’ करेल – विलास लांडे

एमपीसी न्यूज – पालकमंत्री गिरीश बापट यांनी चाकण येथील एका कार्यक्रमात विलास लांडे याना लोकसभेची उमेदवारी देणे म्हणजे त्याचा बळीचा बकरा करणे अशा आशयाचे वक्तव्य केले होते. त्याला विलास लांडे यांनी युतीची नौटंकी जनतेला माहिती झाली आहे. त्यामुळे यावेळी जनताच त्यांना बळीचा बकरा बनवेल असे प्रत्युत्तर दिले.

शिरुर लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून विलास लांडे यांना उमेदवारी देण्याचे संकेत मिळत आहेत. परिवर्तन यात्रेच्या निमित्ताने विलास लांडे यांनी शिरुर लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदारांविरोधात फ्लेक्सबाजी करत वातावरण निर्मिती केली आहे. त्यामुळे लांडे-आढळराव फाईट होण्याची चर्चा रंगली आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट चाकण येथे एका कार्यक्रमानिमित्त आले असताना त्यांनी ” मागच्या लोकसभा निवडणुकीनंतर सक्रीय न दिसणारे विलास लांडे इतके वर्ष कुठे होते ? असा सवाल करत लांडे यांना उमेदवारी म्हणजे त्यांचा बळीचा बकरा करण्याचे काम असल्याचे वक्तव्य केले होते.

विलास लांडे म्हणाले की, शिकार करायची असेल तर वाघ एक पाऊल मागे जातो. त्यामुळे मागील लोकसभा निवडणुकीनंतर मी शांत होतो. आता शिरुर लोकसभा मतदारसंघात तुफान येणार आहे. या तुफानामध्ये कोणतीही लाट टिकणार नाही, याची जाणीव झाल्यामुळेच विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे आपल्याविरोधात आत्तापासूनच अपप्रचार सुरु झाला आहे. युतीची नौटंकी जनतेला माहिती झाली आहे. त्यामुळे यावेळी जनताच त्यांचा बळीचा बकरा बनवेल. राष्ट्रवादीकडून आपल्याला अद्याप उमेदवारी जाहीर झाली नाही. केवळ फ्लेक्स लावले तर विरोधकांच्या पोटात गोळा आला आहे. त्यातून उद्विग्न होवून ते अशी वक्तव्ये करु लागले आहेत. अजून कशात काही नसताना त्यांनी माझा इतका धसका घेतला आहे, तर खरोखरच उमेदवारी जाहीर झाली तर त्यांना पळता भुई थोडी होईल. याची त्यांनाही जाणीव आहे.

त्यामुळे नुसत्या चर्चेने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. पालकमंत्र्यांनी माझी काळजी करण्यापेक्षा युतीची काळजी करावी. सत्तेत राहून वाटून खायचे आणि इतरवेळी सवतासुभा दाखवायचा ही शिवसेना-भाजप युतीची खेळी मतदारांनी जाणली आहे. जनतेला ‘बळीचा बकरा’ बनविणाऱ्यांचे आता ‘बुरे दिन’ सुरु झाले आहेत, असा टोला विलास लांडे यांनी लगावला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.