Pune : अपंग कल्याण आयुक्तांची बदली रद्द करा; शिक्षक संघटनेची मागणी

एमपीसी न्यूज – पुण्याचे अपंग कल्याण आयुक्त बालाजी मंजुळे यांनी पदभार स्वीकारल्यापासून विविध चांगल्या योजना राबविल्या होत्या. राज्यातील अपंग व्यक्तींना या योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ होत आहे. तसेच धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी ते प्रयत्नशील होते. परंतु, राज्य सरकारने त्यांची बुधवारी अचानक बदली केली आहे. अपंगांसाठी तळमळीने काम करणा-या कर्तव्यदक्ष अधिका-याची बदली करुन सरकारने अपंग क्षेत्राची क्रुर चेष्टा व थट्टा केली आहे. मंजुळे यांची बदली तातडीने रद्द करावी, अशी मागणी बहुजन शिक्षक संघटनेने केली आहे.

याबाबत पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, बालाजी मंजुळे हे स्वत: अपंग होते. त्यामुळे त्यांना अपंग नागरिकांच्या समस्यांची, प्रश्नांची जाण होती. मंजुळे यांनी पदभार स्वीकारल्यापासून राज्यातील अपंग व अपंगांच्या विशेष शाळा, वसतिगृह कार्यशाळा, बालगृहे इत्यादीसाठी विविध प्रकारच्या शासकीय योजनांची अमंलबजावणी केली होती. अपंगांच्या तक्रारींच्या निपटारा, वैश्विक युनिक ओळखपत्र, तरतूद निधीचे वाटप, शिवनेरी व शिवशाही बसमध्ये अपंगांना सवलत, विशेष शाळांतील कर्मचा-यांचे समायोजन, कर्णबधीर, अंध मुलांनी उच्च शिक्षण घेऊन स्पर्धा परिक्षामध्ये निवड होण्यासाठी प्रशिक्षण, शिष्यवृत्ती, कर्ज योजना, अपंग विशेष शाळा संहिता 18 मध्ये सुधारणा होण्यासाठी समिती गठित केली होती.

विशेष शाळांची अनुज्ञाप्ती प्रक्रिया सोपी व सुलभ व्हावी. शाळांचे वेतन व वेतनेत्तर अनुदान वेळेत मिळावे. अपंग शाळांचा प्रवर्गनुसार व्यावसायिक अभ्यासक्रम तयार करणे असे अनेक धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आयुक्त बालाजी मंजुळे प्रयत्नशील होते. परंतु, राज्य सरकारने काल अचानक त्यांची बदली केली आहे. या निर्णयामुळे राज्यातील समस्त अपंग बांधवांना धक्का बसला आहे. अपंगांसाठी तळमळीने काम करणा-या कर्तव्यदक्ष अधिका-याची बदली करुन सरकारने अपंग क्षेत्राची क्रुर चेष्टा व थट्टा केली आहे. या विभागाला अभ्यासू व कर्तव्यदक्ष असलेल्या मंजुळे यांची गरज आहे. त्यामुळे त्यांची बदली रद्द करावी. त्यांना किमान चार ते पाच वर्ष अपंग कल्याण आयुक्त म्हणून काम करण्याची संधी द्यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.