Pimpri : सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

एमपीसी न्यूज – वेगवेगळ्या कारणांसाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी आणि चारित्र्याच्या संशयावरून छळ या त्रासाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (दि. 2) दुपारी चारच्या सुमारास वल्लभनगर पिंपरी येथे घडली. याप्रकरणी विवाहितेच्या वडिलांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

दिलीप मनोहर दीक्षित (वय 57, रा. पसुरे, ता. भोर) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार स्वरूप ज्ञानेश्वर क्षीरसागर (वय 34), पद्मा ज्ञानेश्वर क्षीरसागर (वय 60), ज्ञानेश्वर गोविंद क्षीरसागर (वय 64, सर्व रा. वल्लभनगर, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्नेहा स्वरूप क्षीरसागर (वय 35) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत स्नेहा आणि स्वरूप यांचा 2012 साली विवाह झाला. विवाहानंतर स्वरूप आणि त्याच्या घरच्यांनी स्नेहा यांच्याकडे फ्लॅट, बाळंतपणाचा खर्च, नवीन गाडी घेणे अशा विविध कारणांसाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली. तसेच तिचा वारंवार शारीरिक आणि मानसिक छळ केला. या त्रासाला कंटाळून स्नेहा यांनी रविवारी दुपारी चारच्या सुमारास राहत्या घरात बेडरूममध्ये पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. यावरून सासरच्या मंडळींनी विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.