Chinchwad : राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा उद्योग संघटनेचा इशारा

एमपीसी न्यूज – महावितरणने नुकतीच केलेली वीजदरवाढ व औद्योगिक ग्राहकांची बंद केलेली पॉवर फॅक्टर पेनल्टी यामुळे वीजबिलात 20 टक्के ते 25 टक्केपेक्षा जास्त वाढ झाली आहे.याबाबत उद्योगांना अनुकूल असे निर्णय घेण्यात न आल्यास राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनांनी दिला आहे.

मुंबई येथे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीजच्या फोर्ट येथील सभागृहात वीज दरवाढ आणि पॉवर फॅक्टर पेनल्टीबाबत चर्चासत्र व पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे, पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, सचिव जयंत कड व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीज मुंबईचे संयुक्त सचिव मुकुंद माळी, ठाणे इंडस्ट्रीज असोसिएशनचे अशोक पेंडसे व संपूर्ण राज्यातील जिल्हावार प्रतिनिधी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेच्यावतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार महावितरणने नुकतीच केलेली वीजदरवाढ व औद्योगिक ग्राहकांची बंद केलेली पॉवर फॅक्टर पेनल्टी यामुळे वीजबिलात 20 टक्के ते 25 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली असून याचा राज्यातील लघु व मध्यम उद्योगावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होत आहे. आधीच औद्योगिक मंदीमुळे उद्योजक मेटाकुटीला आला असून या वीज दरवाढीमुळे तसेच सात टक्के फॅक्टर पेनल्टीमुळे उद्योग दुस-या राज्यात स्थलांतरित करणे अथवा बंद करणे असे दोनच पर्याय उद्योगापुढे आहेत.

विदर्भात राज्य सरकारने वीजदरात अनुदान दिले असून विदर्भ व उर्वरित महाराष्ट्र येथील वीज दरात 10 टक्के फरक असून विदर्भात वीज 10 टक्के स्वस्त आहे. विदर्भात वेगळा वीजदर व उर्वरित महाराष्ट्राला वेगळा वीज दर असा भेदभाव सरकारकडून केला जात आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये 15 जानेवारी 2019 च्या आत पिंपरी-चिंचवडमधील सर्व औद्योगिक व्यापारी संघटनांची पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटनेच्या नेतृत्वाखाली समन्वय बैठक आयोजित करण्यात येणार असून 20 ते 31 जानेवारी 2019 या काळात आंदोलन करण्यात येणार असून त्यासंदर्भात सूचना 31 डिसेंबर 2018 पर्यंत पिंपरी-चिंचवड लघुउदयोग संघटनेच्या 2 /3 सदगुरु प्लाझा, थरमॅक्स चौक, चिंचवड येथील कार्यालयात लेखी स्वरुपात आणून द्याव्यात, असे आवाहन संघटेनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.