Pimpri : कॉम्प्रेसर फुटल्याने लागलेल्या आगीत 22 बक-या जळून खाक

एमपीसी न्यूज – टायरच्या दुकानातील कॉम्प्रेसर फुटल्याने आग लागली. या आगीत तीन दुकाने आणि 22 बक-या जळून खाक झाल्या. ही घटना आज (रविवारी) पहाटे पाचच्या सुमारास मोरवाडी लालटोपीनगर येथे घडली.

मोरवाडी लालटोपीनगर येथे मजीद दादामियाँ थोरपे यांचे ‘शानदार मटण शॉप’ हे दुकान आहे. त्यांच्या दुकानाशेजारी ‘मारुती टायर आणि पंक्चर’ काढण्याचे दुकान आहे. शनिवारी रात्री टायरच्या दुकानातील कॉम्प्रेसर सुरु होता. पहाटे साडेचारच्या सुमारास कॉम्प्रेसर फुटला. त्यामुळे सुरुवातीला टायरच्या दुकानाला आग लागली. त्याशेजारी असलेल्या थोरपे यांच्या दोन दुकानांना देखील यामुळे आग लागली. त्या दोन दुकानात मिळून 22 बक-या होत्या. अचानक लागलेल्या आगीत दोन्ही दुकानातील सर्व बक-या जळाल्या.

मजीद थोरपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “दुकानाला आग लागल्याची माहिती देण्यासाठी अग्निशमन विभागला फोन केला. मात्र पहाटे अग्निशनम विभागाचा फोन लागला नाही. त्यामुळे लगेच संत तुकाराम नगर अग्निशमन केंद्रात धाव घेतली. त्यावेळी अग्निशमन विभागाकडून चालक नसल्याचे कारण सांगण्यात आले. या प्रकारामुळे आग विझविण्यासाठी तब्बल एक तास उशीर झाला. या कालावधीत दुकाने आणि बक-या जळून खाक झाल्या. असा आरोप देखील थोरपे यांनी केला.”

अग्निशमन विभागाचे ऋषिकांत चिपाडे म्हणाले, “मोरवाडी लालटोपीनगर मधून आगीचा कॉल पहाटे 5.21 वाजता आला. त्यावेळी तात्काळ संत तुकाराम नगर येथील एक गाडी पाठवून दिली. त्यानंतर पहाटे 5.25 वाजता प्राधिकरण अग्निशमन विभागाची एक गाडी पाठवण्यात आली. तसेच 5.31 वाजता चिखली अग्निशमन विभागाची आणखी एक गाडी पाठवण्यात आली आहे. थोरपे संत तुकाराम नगर अग्निशमन विभागात आले तेंव्हा एक गाडी पाठविण्यात आली होती. आणि एकच चालक असल्याने संत तुकाराम नगर येथील दुसरी गाडी पाठवण्यात आली नाही. मात्र अन्य दोन गाड्या पाठवण्यात आल्या होत्या.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.