Talegaon : अभ्यास न झाल्याने वडिलांच्या भीतीने घरातून निघून गेलेला मुलगा सापडला

एमपीसी न्यूज – अभ्यास झाला नाही म्हणून वडील रागावतील या भीतीने चौथीमध्ये शिकणारा घरातून निघून गेला. तळेगाव पोलिसांनी त्याचा तांत्रिक शोध घेत तपास केला. दोन दिवसानंतर तो सुखरूप घरी परतला. ही घटना तळेगाव येथे घडली.
तनिष्क मच्छिन्द्र सावंत (वय 9, रा. तळेगाव दाभाडे) असे घरातून निघून गेलेल्या मुलाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तनिष्क इयत्ता चौथीमध्ये शिकतो. सोमवारी (दि. 22) त्याचा अभ्यास झाला नाही. अभ्यास न केल्यामुळे वडील रागावणार या भीतीने त्याने सोमवारी रात्री दहाच्या सुमारास घर सोडले. मुलगा अचानक घरातून गायब झाल्याने घरच्या मंडळींनी सर्वत्र शोध घेतला. त्यानंतर पोलिसात तक्रार दिली. तनिष्क जवळ घरातून बाहेर पडताना मोबाईल फोन सोबत होता. तळेगाव पोलिसांनी तनिष्कजवळ असलेल्या मोबाईलवर फोन केला. परंतु त्याने फोन उचलला नाही. त्यामुळे पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने तपास करत त्याचा मोबाईलचे टॉवर लोकेशन तपासले. त्यावेळी तनिष्क मावळ तालुक्यातील इंदोरी या गावात त्याचा मोबाईल असल्याचे समजले. त्यामुळे इंदोरी आणि परिसरातील गावक-यांच्या व्हाट्स अप ग्रुपवर तनिष्कचा फोटो पसरवला असता तो इंदोरी मधील मारुती मंदिराजवळ मिळून आला.
त्याच्याकडे घर सोडण्याचे कारण विचारले असता त्याने अभ्यास झाला नाही. त्यामुळे वडील रागावतील म्हणून त्या भीतीने घर सोडल्याचे सांगितले. ही कामगिरी पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुदास जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमरनाथ वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर बाजीगरे, इम्रान मुल्ला, बंडू मारणे, कीर्तिकुमार देवरे, दीपक काठे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.