Pimpri : पाण्याचे श्रेय म्हणजे भाजपचे अपयश – दत्ता साने

पाणी आरक्षणाची मंजुरी अजितदादांचीच, आता केवळ मुदतवाढ

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरासाठी पवना, आंद्रा आणि भामा आसखेड धरणातून पिण्याचे पाणी देण्यासाठी ठेवलेल्या आरक्षणास राज्य सरकारच्या मंत्री उपसमितीने फक्त मुदतवाढ दिली आहे. या धरणातील पाण्याच्या आरक्षणास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच मंजुरी दिली होती. भाजप पदाधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे पाण्याचे आरक्षण रद्द झाले होते. आता शहरासाठी आम्ही पाण्याचे आरक्षण मंजुर केल्याची टिमकी वाजवत असून पाण्याचे श्रेय म्हणजे भाजपचे अपयश आहे अशी, टीका महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली.

साने म्हणाले, पवना धरणातून चौथ्या टप्प्यासाठी 48.567, आंद्रा धरणातून 38.87 आणि भामा आसखेड धरणातून 60.79 दलघमी पाणी आरक्षणाला राज्य सरकारच्या मंत्री उपसमितीने केवळ मुदतवाढ दिली आहे. त्याचबरोबर  सिंचन पुर्नस्थापनेसाठी सुमारे 238 कोटी रुपये पुढील पाच वर्षात टप्पाटप्पाने समान हप्त्यांमध्ये भरावे लागणार आहे. मात्र, राष्ट्रवादीचे नेते व तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार जलसंपदा मंत्री असतानाच पवना, आंद्रा व भामा आसखेड धरणातून पिण्याच्या पाण्याच्या आरक्षणास मंजुरी देण्यात आली होती. मात्र भाजप सरकारच्या नाकर्तेपणामुळे धरणांसाठीच्या पुर्नस्थापना खर्चापोटी 238 कोटी पालिकेने विहित मुदतीत न भरल्याने गेल्या 23 जुलै 2018 रोजी जलसंपदा विभागाने हेे आरक्षण रद्द केले होते. मनपा आयुक्तांनी एप्रिल  महिन्यात फेरप्रस्ताव सादर केला होता.

त्यानुसार मंत्री उपसमितीने पूर्वीच्याच आरक्षणास मुदतवाढ दिली आहे. आरक्षणास मुदतवाढ मिळल्यानंतर मात्र महापालिकेतील पदाधिकाऱ्यापासून ते आमदार, पालकमंत्र्यापर्यत आमच्यामुळेच आरक्षण मंजुरी मिळाली असे नेहमीप्रमाणे श्रेयाची ढोलकी वाजवित असल्याचा आरोप साने यांनी केला आहे.

गेल्या दोन वर्षापासून भाजपची सत्ता पालिकेत आहे. परंतु दोन वर्षात भाजपने एक तरी असा प्रकल्प किंवा विकास काम दाखवावे कि, हो आम्ही हे करुन दाखवले. राष्ट्रवादीच्या काळातील मंजुर कामे नाव बदलून त्यात वाढीव कामे काढून ती कामे आम्ही केली असे शहरातील जनतेपुढे चित्र रंगविले जात असल्याचेही साने म्हणाले.

शहरातील जनतेला मुलभूत सुविधा पाणी, कचरा समस्या भाजपकडून सुटत नाहीत हे काय विधायक विकास कामे करणार असा सवाल करत साने म्हणाले,  भाजपच्या  अंतर्गंत गटबाजीमुळे व भष्ट्राचारामुळे शहरातील विकासाचा बट्याबोळ झाला आहे. भाजपचे पदाधिकारी फक्त आश्वासनाची गाजरे दाखवित आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.