Raigad News : खालापूर जवळ इर्शालगड गावातील वस्तीवर दरड कोसळली; शेकडोजण मलब्याखाली अडकले

एमपीसी न्यूज – रायगड जिल्ह्यातील खालापूर जवळ इर्शालगड गावातील एका वस्तीवर डोंगराची दरड कोसळली. ही घटना बुधवारी (दि. 19) सायंकाळी घडली. यामध्ये शेकडो नागरिक दरडीखाली अडकले गेले आहेत. बचाव पथकाकडून नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

Lonavala : लोणावळा शहरात यावर्षीचा विक्रमी पाऊस; 24 तासात 273 मिमी पावसाची नोंद 

रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. रायगड जिल्ह्यातील खालापूर येथे चौक गावापासून सहा किलोमीटर डोंगर भागात असलेल्या इर्शालगड गावात दरड कोसळण्याची घटना घडली.

या गावांमध्ये सुमारे 40 घरे आहेत. ही सर्व घरे दरडी खाली सापडली आहेत. दरडीखाली 100 पेक्षा अधिक लोक अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. गावातील लोक रात्रीच्या वेळी झोपेत असतानाच रात्री साडेदहा ते अकरा वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

 

रात्रीच्या वेळी आजूबाजूच्या परिसरातील गावकऱ्यांनी मदत कार्यास सुरुवात केली. घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ, अग्निशमन, खालापूर पोलीस अशी बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. बचाव कार्य सुरू असताना अग्निशमन विभागातील एक जवान खूप दम लागल्याने मृत्युमुखी पडला. त्यामुळे बचाव कार्य करतानाही बचाव पथकांना खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.

 

उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्रालयातील आपत्कालिन नियंत्रण कक्षात पोहचले असून तिथून या दुर्घटनेतील नागरिकांच्या बचाव आणि मदतकार्याचं संनियंत्रण करीत आहेत. पालकमंत्री उदय सामंत घटनास्थळी, दादा भुसे, गिरिश महाजन घटनास्थळी दाखल झाले. आदिती तटकरे यांच्याकडूनही प्रशासनासह बचावकार्य करणाऱ्या पथकांना महत्वपूर्ण सूचना करण्यात आल्या आहेत.

 

या घटनेच्या अनुषंगाने चौक दुरक्षेत्र येथे तात्पुरता नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे. तिथून मदतीबाबत सर्व सूचना दिल्या जात आहेत. बचाव कार्य सुरू असून यामध्ये मृत्यू झालेल्या, तसेच बचावलेल्या नागरिकांची माहिती अद्याप समोर आली नाही.

 

 

Pune : अंगावर चिखल उडाला म्हणून टोळक्याने केली कोयत्यांनी वाहनांची तोडफोड

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.