Irshalwadi : ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचे जीव वाचविण्याला सर्वोच्च प्राधान्य – अजित पवार

एमपीसी न्यूज – रायगड जिल्ह्यातल्या (Irshalwadi) इरशाळवाडीवर (ता. खालापूर) दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचे जीव वाचविण्याला राज्य शासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. ‘एनडीआरएफ’च्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाच्या पथकासह स्थानिक स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने मदत व बचाव कार्य वेगाने सुरु असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

दोन हॅलिकॉप्टर तयार ठेवण्यात आले आहेत तथापि, खराब हवामानामुळे हवाई मदत कार्यावर मर्यादा येत आहेत. राज्य शासन प्रत्येक बाबींवर बारकाईने नजर ठेऊन आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे, तर जखमींवर सरकारच्यावतीने मोफत उपचार करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री पवार यांनी विधान परिषद सभागृहात निवेदनाद्वारे दिली.

या दुर्घटनेत इरशाळवाडी या गावातली घरे मातीच्या ढिगाऱ्या खाली गेली आहेत. गेल्या तीन-चार दिवसांपासून पडणाऱ्या संततधार पावसामुळे आणि दुर्घटना घडलेले ठिकाण दुर्गम भागात असल्याने त्याठिकाणी संपर्क साधताना देखिल अडथळे येत होते.

Raigad News : इरशाळवाडी दुर्घटना; शोध आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू

दुर्घटनास्थळ दुर्गम असल्याने त्या ठिकाणी मदत आणि (Irshalwadi ) बचाव कार्यासाठी आवश्यक असणारी जेसीबी सारख्या मशनरी घटनास्थळी पोहोचविण्यासाठी हॅलिकॉप्टरची आवश्यकता आहे. राज्य सरकारने दोन हॅलिकॉप्टर तयार ठेवली आहेत. मात्र खराब हवामानामुळे हॅलिकॉप्टरला उड्डाण करणे शक्य होत नाही, त्यामुळे हवाई आणि यांत्रिक मदतीला सुद्धा मर्यादा येत आहेत.

त्यामुळे मनुष्यबळाकडूनचं मदत व बचाव कार्य करावे लागत आहे. ‘एनडीआरएफ’ पथकाच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक प्रशासनाच्या मदतीला यशवंती हाइकर्स, निसर्ग ग्रुप पनवेल या स्वयंसेवी संस्थेचे स्वयंसेवक, मौजे चौक आणि मौजे वरोसे येथील ग्रामस्थ, विविध विभागाचे शासकीय कर्मचाऱ्यांसह पाचशेहून अधिक मजुरांचा सहभाग आहे.

मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्याला तसेच नागरिकांचे जीव वाचविण्याला सरकारचे प्राधान्य आहे. इरशाळवाडीच्या पायथ्याला वैद्यकीय पथके, अॅम्ब्युलन्ससह आवश्यक अशा वैद्यकीय सुविधा व इतर साहित्य तात्काळ उपलब्ध करण्यात आले आहे.

या ठिकाणी यापूर्वी दरड कोसळणे, भूस्खलन होणे आशा प्रकारच्या घटना घडलेल्या नव्हत्या. खालापूर तालुक्यात 17 ते 19 जुलै 2023 या तीन दिवसांत एकुण 499 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. दुर्घटना घडलेले ठिकाण हे अत्यंत दुर्गम भागात असून, सद्यःस्थितीत घटनास्थळाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत असल्याने बचावकार्यात अडथळा येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.