Lonavala : लोणावळा शहरात यावर्षीचा विक्रमी पाऊस; 24 तासात 273 मिमी पावसाची नोंद 

एमपीसी न्यूज – घाटमाथ्यावरील पावसाचे माहेरघर असलेल्या लोणावळा (Lonavala ) शहरात बुधवारी (19 जुलै) 24 तासात 273 मिमी (10.75 इंच) इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. यावर्षीच्या हंगामात झालेला हा सर्वाधिक पाऊस आहे. हवामान विभागाने पुढील दोन ते तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. मागील तीन दिवसात शहरात तब्बल 705 मिमी पाऊस झाला आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर लोणावळा शहरातील सर्व शाळांना आज सुट्टी जाहिर करण्यात आली आहे.

Raigad News : खालापूर जवळ इर्शालगड गावातील वस्तीवर दरड कोसळली; शेकडोजण मलब्याखाली अडकले

लोणावळा शहरात जुन महिन्यांपासून आजपर्यंत 2017 मिमी (79.41 इंच) पाऊस झाला आहे. मागील वर्षी आजपर्यंत 2622 मिमी (103.23 इंच) पाऊस झाला होता. सोमवारपासून पावसाचा जोर वाढल्याने शहरातील काही रस्त्यावर पाणी साचू लागले आहे.

 

मावळा पुतळा चौकात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून दुकानांच्या जोत्याला पाणी लागले आहे. शहानी रोड, बस स्थानकाच्या बाहेरील रस्ता, बाजारातील रस्ते, रायवुड भागातील रस्ते, नांगरगाव वलवण रस्त्यावर पाणी साचले आहे. आर्दश काॅलनी नांगरगाव समोरील मुख्य रस्ता कालपासून पाण्याखाली गेला असून सोसायटीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.

 

लोणावळा धरणाच्या पायथ्याजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर खंडाळा येथे सातु हाॅटेलसमोर पाण्याची मोरी बंद केल्याने मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे तसेच खंडाळ्यातील पोस्ट कार्यालयाच्या मागील पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.