Chinchwad News : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची हद्द लोणावळ्यापर्यंत वाढणार?

पोलीस आयुक्तांचा महासंचालकांकडे प्रस्ताव

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय थेट लोणावळा शहरापर्यंत पोहोचणार आहे. पुणे ग्रामीण पोलीस हद्दीतील वडगाव मावळ, कामशेत, लोणावळा ग्रामीण आणि लोणावळा शहर या पोलीस ठाण्यांचा समावेश पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पोलीस महासंचालकांकडे पाठवला आहे.

आयुक्तांनी प्रस्ताव पाठवल्यानंतर महासंचालकांनी पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक यांना संबंधित पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामपंचायतींकडून अभिप्राय घेण्यास सांगितले आहे. वडगाव मावळ, कामशेत, लोणावळा ग्रामीण आणि लोणावळा शहर या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत याबाबतचा ठराव मांडून त्याबाबतचा निर्णय महासंचालक कार्यालयास काळविण्याचे पोलीस अधीक्षकांना सांगण्यात आले आहे.

पुणे पोलीस आयुक्तालयातील पिंपरी, चिंचवड, निगडी, भोसरी, एमआयडीसी भोसरी, दिघी, सांगवी, वाकड, हिंजवडी पोलीस ठाणे तर पुणे ग्रामीण मधील देहूरोड, तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी, आळंदी आणि चाकण पोलीस ठाण्यांचा समावेश करून 15 ऑगस्ट 2018 रोजी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय स्वतंत्रपणे कार्यान्वित करण्यात आले. त्यानंतर चिखली पोलीस ठाणे नव्याने सुरू करण्यात आले.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाण्यांची संख्या आणि त्या प्रमाणात मनुष्यबळ वाढविण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहराचे प्रथम पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी चाकण पोलीस ठाण्यातून म्हाळुंगे, देहूरोड पोलीस ठाण्यातून रावेत आणि तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यातून शिरगाव या स्वतंत्र चौक्यांचे पोलीस ठाण्यात रूपांतर होण्यासाठी प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता. दुसरे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी देखील यासाठी पाठपुरावा केला. 4 जानेवारी 2021 रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत या पोलीस ठाण्यांना मंजुरी मिळाली आहे. पुढील प्रशासकीय सोपस्कार झाल्यानंतर या चौक्या पोलीस ठाणे म्हणून कार्यान्वित होतील.

दरम्यान शहराचे तिसरे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाढ करण्याचा प्रस्ताव महासंचालकांकडे पाठवला होता. त्यात पुणे ग्रामीण मधील वडगाव मावळ, कामशेत, लोणावळा ग्रामीण आणि लोणावळा शहर या पोलीस ठाण्यांचा समावेश पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात करण्याचे म्हटले होते.

त्या प्रस्तावावर आता कार्यवाही सुरू झाली असून वडगाव मावळ, कामशेत, लोणावळा ग्रामीण आणि लोणावळा शहर या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील सर्व ग्रामपंचायतींना ग्रामसभेत याबाबतचा ठराव मांडून त्याचा निर्णय घेण्यास पोलीस अधीक्षकांना सांगण्यात आले आहे. ग्रामपंचायतींनी मान्यता दिल्यास या चार पोलीस ठाण्यांचा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात समावेश होणार आहे.

पुणे ग्रामीण मधून सुरुवातीला पाच पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात समाविष्ट करण्यात आली. त्यानंतर आता आणखी चार पोलीस ठाण्यांना समाविष्ट करण्याचा प्रस्ताव पाठवला आहे. त्यामुळे ग्रामीण पोलिसांची हद्द आणि महत्त्व कमी तर होणार नाही ना, अशी चर्चा यानिमित्ताने सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.