Pune : वाहतूक पोलिसांशी उध्दट वर्तन केल्यास कठोर कारवाईचा इशारा – डॉ. के व्यंकटेशम

एमपीसी न्यूज – पुण्यामध्ये दिवसें-दिवस वाढत चाललेल्या वाहतुकीच्या समस्येमुळे अनेक वेळा वाहन चालक आणि वाहतूक पोलीस यांच्यामध्ये वाद होतात. नियम मोडून पोलिसांशी हुज्जत घालणा-या वाहन चालकांवर कठोर कारवाई करणार असल्याचे व याबाबतचे खटले जलद न्यायालयात चालवले जातील, अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त डॉ. के व्यंकटेशम यांनी दिली.

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने वार्तालाप कार्यक्रमात पत्रकारांशी संवाद साधताना डॉ. के व्यंकटेशम यांनी पुणे शहरातील वेगवेगळ्या समस्यांवर चर्चा केली. यावेळी पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, खजिनदार ब्रीजमोहन पाटील, सरचिटणीस पांडुरंग सांडभोर, कार्यकारी सदस्य प्रशांत आहेर व शहरातील अनेक पत्रकार उपस्थित होते

यावेळी सामान्य माणसांना काही अडचणी असतील तर, त्या सोडवण्याला प्राधान्य देणार असून कोअर पोलिसिंगवर भर राहणार आहे. पोलीस शिपाई ते आयुक्तांपंर्यत वैयक्तिक क्षमता वाढवणार असून तंत्रज्ञानाचा वापर वाढवणार असल्याचे यावेळी डॉ. व्यंकटेशम म्हणाले.

तसेच यापूर्वी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी मांडलेल्या तब्बल 41 समस्येंवर काम सुरु केले असून, योग्य त्या कारवाया देखील करण्यात आल्या आहेत. पत्रकार समाज हिताचे काम करतात समाजाच्या तळागाळातील समस्या पत्रकारांना माहिती असतात त्यामुळे त्यांनी समोर आणलेल्या समस्यांवर विशेष लक्ष्य देऊ त्याचे चांगले परीणाम लवकरच दिसतील, असा सकारात्मक विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

अपघात कमी करण्यावर भर
पुण्यात दरवर्षी सरासरी 466 अपघात होतात. शहरातील हे वाढत्या अपघातांचे प्रमाण कमी करायचे आहे. त्याचबरोबर पुण्यात दरवर्षी तीन हजार दुचाकी चोरीला जातात. याचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या वाहनांना लॉक लावावे असेही त्यांनी सांगितले.

तर पीएमपीएमएलवर करणार कारवाई
रस्त्यावर पीएमपीएमएल बसेस बंद पडण्याच्या घटना वाढत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. यापुढे बंद पडणाऱ्या पीएमपीएमएल बसेसवर कारवाई केली जाणार असल्याचे डॉ. व्यंकटेशम यांनी सांगितले.

सायबर गुन्ह्यांवर विशेष लक्ष्य
वाढते सायबर गुन्हे पोलीसांसमोरील सर्वात मोठे आव्हान असून, त्यासाठी विशेष लक्ष देण्यात येणार आहे. तसेच सोशल मिडीयावर देखील पोलीसांचे लक्ष राहिल असे ते म्हणाले. गणेशोत्सवामध्ये जल्लोष करताना नागरिकांनी नियमांचे पालन करावे अशी विनंती यावेळी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.