Akurdi : कवितांमधून केली हेल्मेटविषयी जनजागृती

बीना इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह; 'सर सलामत, तो कविता पचास' चे आयोजन

एमपीसी न्यूज – “मानवी जीवन अमूल्य असून दुचाकी चालवताना शिरस्त्राण (हेल्मेट) आठवणीने घाला” असे आवाहन निवृत्त मुख्याध्यापिका जयनूल इब्राहिम शेख यांनी आकुर्डी येथे केले.

आकुर्डीतील बीना इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाचे औचित्य साधून शब्दधन काव्यमंच आयोजित ‘सर सलामत तो कविता पचास’ या वैशिष्ट्यपूर्ण कविसंमेलनात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना जयनूल शेख बोलत होत्या. यावेळी हाजी इक्बाल खान, पत्रकार लीना माने, शिवाजी विधाटे, शब्दधन काव्यमंचाचे अध्यक्ष सुरेश कंक उपस्थित होते.

  • पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहून आणि राष्ट्रध्वजाचे पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. माधुरी ओव्हाळ लिखित वाहतूक सुरक्षा नियमांच्या प्रतिज्ञेचे सुभाष चव्हाण यांनी वाचन केले आणि सर्व उपस्थितांनी त्याचे सामुदायिकरीत्या उच्चारण केले. तसेच यानिमित्त सोशल मीडियावरून मागविण्यात आलेल्या सुरक्षा घोषवाक्य लेखनाला मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतून उदंड प्रतिसाद मिळाला. माधुरी विधाटे यांनी निवडक घोषवाक्यांचे वाचन केले. नितीन हिरवे यांच्या हस्ते घोषवाक्य लेखकांचा पुस्तके देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी मल्लिकार्जुन इंगळे यांनी सुरक्षा नियमांची माहिती दिली.

साहित्य विश्वात अभिनव असलेल्या ‘सर सलामत तो कविता पचास’ या अनोख्या कविसंमेलनात व्यासपीठावर दोन दुचाकी त्यापैकी एकीवर शिरस्त्राण (हेल्मेट) परिधान करून सूत्रसंचालक आणि दुसरीवर कवी किंवा कवयित्री आणि त्यांच्या मागे जीवनसाथी असे कविसंमेलन रंगले. अध्यक्षांसह सर्व मान्यवरांचे शिरस्त्राण घालून स्वागत करण्यात आले. कविसंमेलनात सुमारे चोवीस कवींनी सहभाग नोंदवला.

  • राज अहेरराव, नंदकुमार मुरडे, सविता इंगळे, देवेंद्र गावंडे, पीतांबर लोहार, योगिता पाखले, प्रा. तुकाराम पाटील, राजेंद्र घावटे, राधाबाई वाघमारे, वाय.के.शेख, निशिकांत गुमास्ते, शोभा जोशी, दीपेश सुराणा, बी.एस.बनसोडे, नंदकुमार कांबळे यांच्या कविता उल्लेखनीय होत्या.

यासाठी मुरलीधर दळवी, मीरा कंक, तानाजी एकोंडे, बाळासाहेब घस्ते, शरद शेजवळ, आय.के.शेख, जयश्री गुमास्ते यांनी संयोजनात परिश्रम घेतले. प्रदीप गांधलीकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर उमेश सणस यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.