-MPC-TOP-MOST-BANNER-I

Tata Power :…आणि निळ्या पंखावरील धोक्याचे लाल सावट दूर झाले ; गोड्या पाण्यातील वाघ

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – वाघ म्हटलं की आठवतो जंगलातला वाघ, नुसत्या रूपाने दरारा गाजवणारे पट्टेदार शरीर, अवघे जंगल हादरवून सोडणारी डरकाळी! या रुबाबदार प्राण्यावर आजवर कितीतरी कथा-कहाण्या लिहिल्या व चित्रिल्या गेल्या आहेत.

पण आपल्यापैकी किती जणांना ठाऊक आहे की अजून एक ‘वाघ’ आहे जो तितकाच राजसी आहे आणि तो पाण्यावर अधिराज्य गाजवतो? हा आहे एक मोठा, आश्चर्यकारक मासा, जो नद्या, प्रवाहांमध्ये पोहोताना जणू सोनेरी किरणाप्रमाणे भासतो. आपल्यापैकी किती जणांना माहसीरबद्दल माहिती आहे? राजसी रुबाब आणि प्रभावी गुण असलेला हा एक मासा आहे. गोड्या पाण्यातील हा मासा गेली अनेक वर्षे नामशेष होण्याच्या धोक्याचा सामना करत आहे.

एक काळ असा होता जेव्हा हा राजेशाही दिसणारा मासा देशभरातील नद्या, तलावांमध्येच नव्हे तर हिमालय आणि सह्याद्री पर्वतरांगांमधील प्रपातांमध्ये देखील आढळून येत असे. प्रचंड शुभ्र धारांमध्ये हा चंचल मासा पाण्याच्या पृष्ठभागाच्या ठीक खाली पोहायचा, जलभित्तींना टकरा देत, कोवळ्या सूर्यप्रकाशात चमचमणारे त्याचे शरीर शानदार दिसायचे.

पण लवकरच त्याचा विशाल आकार आणि प्रभावी रूपच त्याचा काळ ठरले आणि माहसीरची मोठ्या प्रमाणावर शिकार केली जाऊ लागली. मासेमारी करणारे कोळी आणि मोठ्या कंपन्यांसाठी माहसीर म्हणजे सहज सापडणारे सावज ठरले. भारतात माहसीरच्या 15 जातींपैकी 5 जातींना नामशेष होण्याच्या गंभीर संकटाला सामोरे जावे लागले आहे.

आजपासून 50 वर्षांपूर्वी टाटा पॉवरने याबाबतीत लक्ष घालण्याचे ठरवले, अशा एका माशासाठी जो खरोखरीच पाण्यावाचून तडफडत होता.

टाटा पॉवर कंपनी या क्षेत्रात आली कशी?

टाटा पॉवरने माहसीरचे संरक्षण आणि संवर्धनाच्या कामी स्वतःला झोकून दिले यामागची कहाणी काहीशी विचित्र आहे. महाराष्ट्रातील गावांमध्ये माहसीरला देव म्हणून पुजले जाते, याचे कारण म्हणजे या माशाचा तोंडाचा भाग जो एखाद्या महिलेने नथ घातली असावी असा दिसतो. तर या लोकांना हळूहळू जाणवू लागले की माहसीरची संख्या घटत चालली आहे आणि मग तो पूर्ण दिसेनासाच झाला.

ते अस्वस्थ झाले खरे पण यासंदर्भात कोणाशी बोलायचे ते कळेना, अखेरीस त्यांनी मत्स्य विभागाशी संपर्क साधला. त्या भागात टाटा पॉवरचा प्लांट होता आणि स्थानिक भागात, लोकांमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील कंपनी म्हणून नावाजली जात असल्याने मत्स्य विभागाने टाटा पॉवरकडे मदतीची विनंती केली.

अशाप्रकारे ठीक पन्नास वर्षांपूर्वी टाटा पॉवर आणि माहसीर यांच्यातील मैत्रीची सुरुवात झाली.

याकामी पहिले पाऊल म्हणून कंपनीने सखोल अभ्यास व संशोधनास सुरुवात केली. त्यामध्ये असे आढळून आले की, कारखान्यांमधून नद्या व तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात सोडण्यात येणारे सांडपाणी, अनियंत्रित मासेमारी, अंडी व छोट्या पिल्लांचीही शिकार केली जाणे, ढासळते पर्यावरण आणि एकाच वेळी भरपूर प्रमाणात माशांच्या शिकारीसाठी स्फोटकांचा वापर यासारख्या अनेक कारणांमुळे माहसीर नामशेष होऊ लागला होता.

एकंदरीत परिस्थितीचे काळजीपूर्वक विश्लेषण केल्यानंतर महाराष्ट्रातील लोणावळा येथे टाटा पॉवरच्या वाळवण धारण प्रकल्पाच्या जवळ केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्थेच्या सहयोगाने माहसीर प्रजनन केंद्र स्थापन करण्यात आले. यामध्ये निळे कल्ले असलेल्या आणि सर्वाधिक लक्षणीय सोनेरी माहसीरवर लक्ष केंद्रीत करण्यात आले. गेली 50 वर्षे या केंद्राने या मौल्यवान प्रजातीच्या संख्यावृद्धीसाठी मदत, संकल्पना आणि अभिनव उपक्रम राबवले आहेत.

आणि आज जागतिक पर्यावरण दिनी आम्हाला हे जाहीर करताना अतिशय आनंद होत आहे की निळ्या कल्ल्यांच्या माहसीरला आययुसीएनच्या लाल यादीमधून वगळण्यात आले आहे.

सोनेरी माहसीर अजूनही त्या यादीमध्ये आहे पण लवकरच तो देखील त्यामधून बाहेर येईल याची आम्हाला खात्री आहे.     

पर्यावरणाच्या संतुलनासाठी माहसीर इतका महत्त्वाचा का आहे?

हा मासा अतिशय अनोखा आहे, पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण कमी होणे, पाण्याच्या तापमानातील आणि वातावरणात अचानक होणारे बदल यांचा माहसीरवर पटकन परिणाम होतो. हा मासा प्रदूषण जरा देखील सहन करू शकत नाही. त्यामुळे जेव्हा आपण नदीमध्ये काहीही कचरा टाकतो तेव्हा आपण माहसीरच्या गळ्याभोवती तर फास आवळतोच शिवाय गोड्या पाण्याच्या शुद्धतेचा सूचक असलेल्या या जीवाला देखील गमावतो. हे दुहेरी नुकसान आहे.

सध्याच्या महामारीने आपल्याला शिकवलेला आणखी एक धडा म्हणजे प्राण्याची व माशांची अनियंत्रित, बेसुमार शिकार करून आपण आपल्या संपूर्ण अधिवासाचे आणि पर्यावरणाचे नुकसान करत आहोत. यामुळे अनेक रोग एका प्राण्यातून दुसऱ्या प्राण्यात, एका पक्षातून किंवा माशातून दुसऱ्यात सहज पसरतात आणि आज तेच आजार मानवजातीचे अपरिमित नुकसान करत आहेत.

म्हणूनच माहसीरचे संरक्षण व संवर्धन करणे, त्याची संख्यावृद्धी घडवून आणणे आणि त्याला आययुसीएनच्या लाल यादीतून बाहेर काढणे हे इतके महत्त्वाचे का आहे हे सध्याच्या परिस्थितीत तर वेगळे समजावून सांगण्याची गरजच नाही. पर्यावरणाचा ढासळलेला तोल सावरण्यासाठी, आपली जैव-विविधता जपण्यासाठी आणि या सर्वांमधून मानवजातीच्या रक्षणासाठी हे काम अतिशय महत्त्वाचे आहे.

टाटा पॉवरने पन्नास वर्षांपूर्वी जो उपक्रम सुरु केला तो किती महत्त्वाचा आहे आणि तो पुढे तसाच सुरु ठेवणे किती गरजेचे आहे ते आजच्या परिस्थितीत सर्वाधिक जाणवते आहे. जे जग पर्यावरणदृष्ट्या संतुलित आणि आजारांपासून मुक्त राखले जाणे हे आपली जबाबदारी आहे आणि आपल्या मुलाबाळांसाठी तरी आपल्याला ती पार पाडलीच पाहिजे. माहसीरसारख्या अतिशय महत्त्वाच्या प्रजातींचे रक्षण आणि संवर्धन केले गेले तरच ते शक्य आहे.

टाटा पॉवरने माहसीरला सक्षम कसे बनवले?

लोणावळा येथील आपल्या वाळवण मत्स्योत्पादन केंद्रामध्ये टाटा पॉवरने एकाच वेळी 4-5 लाख माहसीर अंडी उबवण्याची एक कल्पक पद्धत विकसित केली. एक शतकभरापासून कार्यरत असलेल्या या कंपनीने इंद्रायणी नदीला बांध घालून एक मोठा तलाव निर्माण केला. याठिकाणी निळ्या कल्ल्यांच्या व सोनेरी रंगाच्या माहसीर प्रजातींचे मासे तलावातील अतिशय ऑक्सिजनेटेड पाण्याच्या आवाजाने आकर्षित होऊन एकत्र येतात.

ब्रूडर मासा (जो अंडी उत्पादन करण्यासाठी वापरला जातो) इथून गोळा केला जातो आणि अशा तलावांमध्ये सोडला जातो जिथे उंचावरून पाणी पडत असल्याने होत असलेल्या आवाजात पावसाचे किंवा झऱ्यांमधून पाणी पडल्याचा भास होतो. (यामुळे ब्रूडरच्या प्रजनन प्रक्रियेला प्रोत्साहन मिळते)

अनुभवी कोळी एका अतिशय नाजूक आणि कुशल ऑपरेशनद्वारे अंडी व शुक्राणू ब्रूडर्सपासून वेगळे करतात. मग ही अंडी व शुक्राणू यांना फर्टिलायझेशनसाठी एका मोठ्या ब्रीडिंग ट्रेमध्ये ठेवले जाते. याठिकाणी देखील चांगल्या अंड्यांना, जी सोनेरी रंगाची असतात, त्यांना प्राधान्य दिले जाते.

अंडी फर्टीलाइझ झाल्यानंतर (गेल्या 50 वर्षात 15 मिलियन अंडी फर्टीलाइझ झाली आहेत.) 72-96 तासांमध्ये माशांची बाळे बाहेर येतात आणि लपण्यासाठी अंधारी जागा शोधू लागतात. सुरुवातीला काहीशी लाजाळू असणारी ही बाळे एका महिन्यानंतर एक सेंटिमीटर लांब होतात आणि वेगाने फिरू लागतात. 4 ते 6 महिन्यात हे मासे देशभरातील विविध मत्स्य विभागांकडे सोपवले जाण्यासाठी तयार असतात, जे त्यांना आपापल्या राज्यांतील झरे व नद्यांमध्ये सोडतात.

टाटा पॉवर आणि मत्स्य विभागांदरम्यान हे संपूर्ण काम अतिशय काळजीपूर्वक व सुव्यवस्थित पद्धतीने केले जाते. गेल्या अनेक वर्षात 11.6 मिलियन माशांनी भारतभरात आपली घरे निर्माण केली आहेत. 9 फूट लांब व तब्बल 33 किलोचे वजन असे हे मासे अतिशय प्रभावी आणि आश्चर्यजनक आहेत.

लाजऱ्या, अवघ्या मिलीमीटर इतक्या बाळापासून चमचमणारे, राजसी माहसीर विकसित होण्याचा हा प्रवास जगभरातील अँगलर्सना अचंबित करणारा आहे.

हे मोठे, हसरे आणि खूप खेळणारे-बागडणारे माहसीर तुम्ही यावे आणि त्याच्यासोबत खेळावे याची वाट बघत आहेत. हे मासे आपले पर्यावरण स्वच्छ आणि संतुलित राहावे यासाठी मदत करत असतात हे कधीही विसरू नका.

अतिशय खेळकर मासा 

आता कल्पना करा एका अशा अँगलरची ज्याने खेळाविषयीच्या प्रेमापोटी हजारो मैलांचा प्रवास केला आहे. ताज्या, खळाळत्या पाण्याने दुथडी भरून वाहणाऱ्या नदीच्या किनारी तो थांबतो आणि आपला गळ टाकतो. त्याला फारशी वाट पाहावीच लागत नाही आणि थोड्याच वेळात काहीतरी हालचाल जाणवते. सुरुवातीला हळू आणि मग वाढत जाणारी झटापट, खूप जास्त ओढणारी! त्याच्या थकलेल्या चेहऱ्यावर मेहनतीचे सार्थक होणार असल्याचे समाधान पसरते आणि त्याला पक्की खात्री असते की एक भारी खेळ सुरु होणार आहे.

मासा गळाला तर लागलाय पण खूप प्रयत्न करूनही अँगलर काही त्याला किनाऱ्यावर आणू शकत नाही. महाकाय मासा आणि त्या अँगलरचे बाहू यांच्यात जणू रस्सीखेच सुरु झाली आहे. ती मधली रेघ कोण ओलांडणार याची उत्कंठा ताणणारा हा खेळ तब्बल अर्धा तास सुरु राहतो. अँगलर धापा टाकू लागतो, शरीरातून घामाच्या धारा वाहू लागतात. पण मासा मात्र हार मानायला अजिबात राजी नसतो. अँगलर पाय घट्ट रोवले. हाच तर तो खेळ ज्यासाठी त्याने कैक मैल पार केले होते, जीवतोड मेहनत जरी करावी लागत असली तर मनातून त्याची पक्की खात्री झालेली आहे की त्याला हा खेळ खूप आवडतो आहे.

सरतेशेवटी, दीर्घकाळपर्यंत टक्कर देत राहिल्यानंतर तो महाकाय मासा थकतो आणि हार पत्करायला तयार होतो. जेव्हा माहसीर पाण्याच्या बाहेर येतो तेव्हा अँगलरच्या मनात आनंदाचे चित्कार उमटू लागतात. खऱ्या अर्थाने विशाल आणि अनोखा, हा अनुभव अँगलरसाठी देखील विरळाच असतो.

तब्बल 6 फूट मोठा मासा हातात पकडणे तर अशक्यच असते, त्यात माहसीरची झटापट त्याला नीट उभे देखील राहू देत नाही. माशाचे वजन अंदाजे 30 किलो असेल असा अंदाज लावत अँगलर हळुवारपणे माशाचा हूक काढतो आणि त्याला पुन्हा त्या खळाळत्या प्रवाहात बागडण्यासाठी सोडून देतो. एका क्षणात तो मासा पुन्हा त्याच उत्साहात आणि रुबाबात पोहू लागतो, त्यावेळी असे भासते की जणू तो मासा मिश्कीलपणे हसत म्हणतोय, काय मग! मासा भारी पडला की नाही!

माहसीर हा मासा अँगलर्ससाठी अत्त्युच्च आनंद का असतो याच्या अनेक कहाण्यांपैकी ही एक कहाणी! गेली अनेक दशके अस्सल ब्ल्यू अँगलर्स या अनोख्या खेळासाठी कैक मैलांचा प्रवास करत आले आहेत. बऱ्याचदा परदेशांमध्ये जाऊन देखील हा खेळ खेळला जातो. टाटा मोटर्सचे अध्यक्ष श्री सुमंत मूळगांवकर आणि टाटा इलेक्ट्रिकचे एमडी माणिकताला हे दोघेही अतिशय कुशल अँगलर्स आहेत, आपल्या देशात माहसीर पर्यटन विकसित होण्याला प्रचंड वाव असल्याचे यांनी जाणले. टाटा समूहाने इतके सातत्यपूर्ण प्रयत्न करून माहसीर संवर्धनासाठी मेहनत केली यामागच्या अनेक कारणांमध्ये याचा देखील समावेश आहे.

माहसीरला बनवले तरुणांचे प्रेरणास्थान 

टाटा पॉवर आपल्या क्लब एनर्जीमध्ये युवापिढीसाठी अनेक उपक्रम राबवत असते. माहसीरविषयी माहिती आणि जागरूकता वाढावी यासाठी विशेष मोहिमा देखील काढल्या जातात. मुलांना पर्यावरणातील या अतिशय महत्त्वाच्या घटकांविषयी लहानपणापासूनच माहिती मिळावी, त्याबरोबरीनेच माहसीरसोबत खेळल्या जाणाऱ्या खेळाची गंमत आणि नंतर त्या माशाला पुन्हा पाण्यात सोडून देताना होणारा आनंद हे सर्व त्यांना कळावे ही यामागची कल्पना आहे.

माशाला पुन्हा पाण्यात सोडून देण्याच्या कृतीमधून त्यांना जीवनातील अतिशय महत्त्वाचा संदेश शिकता येतो, तो म्हणजे सोडून देणे, जे आवश्यक नाही ते आपल्याकडे असावे हा अट्टाहास न करणे, निसर्गासोबत संतुलन राखणे आणि निसर्गाशी मैत्री करणे ही शिकवण मुलांना माहसीरच्या रूपाने मिळते.

वाळवण मत्स्योत्पादन केंद्रामध्ये कित्येक मुले खराखुरा जिवंत मासा बघतात, त्याला हात लावतात आणि त्यांच्यापैकी कित्येक जणांसाठी हा पहिलाच असा अनुभव असतो. त्यांच्यासाठी हा क्षण एक आमूलाग्र बदल घडवून आणतो आणि ती मुले मनापासून म्हणतात – इतका सुंदर जीव आम्ही का खातो? जेव्हा त्यांना समजते की, जलप्रदूषणामुळे माहसीरला त्रास होतो, तेव्हा ती मुले नदीला प्रदूषणमुक्त करण्याबाबत विचार-चर्चा करू लागतात. मुलांची मने, त्यांचे विचार शुद्ध असतात, त्यांचे निरीक्षण निरागस असते आणि त्यांच्यापैकी कितीतरी जण त्यांच्या माहसीर दोस्तांना पुन्हा-पुन्हा भेटायला येतात, या उत्साही माशाच्या अक्षरशः प्रेमात पडतात.

50 वर्षे झाली पण काम अद्याप पूर्ण झालेले नाही. 

दरवर्षी माहसीर माशांची संख्या कैक पटींनी वाढते आहे. आययुसीएनच्या लाल यादीतून माहसीरचे नाव काढले जावे यासाठी इतर कॉर्पोरेट पद्धतींपेक्षा अतिशय वेगळ्या प्रकारे म्हणजे अक्षरशः धोकादायक क्षेत्रांमध्ये (लाल) जाऊन या उपक्रमाचे यश जोखले जाते.

तब्बल 50 वर्षांच्या दीर्घ कारकिर्दीतील आमचे यश हे आम्ही विकसित केलेल्या माशांच्या संख्येवरून मोजले जाऊ शकते. ही संख्या वाढण्याऐवजी दरवर्षी कमी होऊ लागली आहे. याचाच अर्थ असा की माहसीर माशांची संख्या नैसर्गिक पद्धतीने वाढते आहे. नद्या आणि तलाव पुन्हा एकदा माहसीरची घरे अंगणे बनली आहेत, वाळवण केंद्रातून आलेल्या माशांनी स्वतः प्रजनन करायला सुरुवात केली आहे. विविध ठिकाणी माहसीर दिसू लागल्याची नोंद अँगलर्सनी केली आहे. पण सोनेरी माहसीर अद्याप देखील लाल यादीत आहे. जेव्हा त्याचे नाव त्या यादीतून वगळले जाईल तेव्हाच टाटा पॉवरला आपले कार्य सफळ संपूर्ण झाल्याचे समाधान लाभेल.

माहसीरला भेटा 

माहसीर प्रकल्पाच्या प्रदीर्घ वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा म्हणून 50व्या वर्षात टाटा पॉवर विविध उपक्रमांचे, मोहिमांचे आयोजन करणार आहे. हा तेजस्वी, महाकाय मासा भारतीयांच्या हृदयांपर्यंत पोहोचावा यासाठी मीडिया व शैक्षणिक साधने तयार केली जातील.

अनेक परिषदा, परिसंवाद, तज्ञांच्या व्याख्यानांचे आयोजन केले जाईल, कुशल अँगलर्स आपले अनुभव सर्वांना सांगतील, विविध प्रसिद्धीमाध्यमांमधून सर्वसामान्य लोकांना माहसीरबद्दल रोचक माहिती दिली जाईल, माहसीर मर्चन्डाईज आणि स्टेशनरी तयार केली जाईल, शालेय विद्यार्थ्यांसाठी मत्स्योत्पादन केंद्रामध्ये कार्यशाळा व शिबिरे आयोजित केली जातील, त्यांना याठिकाणी हा मासा प्रत्यक्ष पाहता येईल, इतर वन्यजीवनाचा, संवर्धन संघटनांच्या कामाचा अनुभव घेता येईल आणि यातून त्यांच्या जागरूकतेच्या कक्षा रुंदावतील.

या महान माशाला भेटण्याच्या कितीतरी संधी उपलब्ध करवून दिल्या जातील, ज्यामधून तुम्हाला एक मित्र जोडता येईल, असा मित्र जो तुम्हाला आयुष्यभरासाठीची ज्ञानाची शिदोरी देईल, त्याच्यासोबत तुम्हाला शुद्ध, सुंदर निसर्ग अनुभवता येईल.

 

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn