Alandi News : आळंदी केळगाव बाह्यवळणावरच्या रस्त्यावरती उघड्यावरच मृत पावलेले जनावर

एमपीसी न्यूज :- दि.19 आळंदी येथील चाकण रस्त्यालगत बाह्यवळणावरच्या आळंदी-केळगाव रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कचरा टाकल्याने हा कचरा रहदारीस अडसर ठरत असून येथे उघड्यावरच मृत पावलेले एक जनावर या ठिकाणी टाकण्यात आले आहे.
त्या मृत जनावराचे भक्षण करण्यासाठी कुत्रे व पक्षी जमा  होत आहे.येथील कचऱ्या मुळे या परिसरात दुर्गंधी पसरल्याने नागरिकांना  रस्त्यावरून जाताना नाक मुठीत धरून चालावे लागत आहे, त्यात भर म्हणून उघड्यावर मृत अवस्थेत असलेल्या या जनावराची दुर्गंधी येथे पसरणार आहे. मृत जनावरामुळे व कचऱ्यामुळे  या परिसरात  रोगराई पसरू नये या करता वरीष्ठ प्रशासनाकडूनच दखल घेत येथे उपाय योजना करायला हवी.

दि.17 ऑगस्ट रोजी आळंदी नगरपरिषदेतील संबंधित विभागाच्या प्रमुख जाधव मॅडम यांनी त्यावेळी सांगितले होते की, कचरा आळंदी पालिका हद्दीत असला तरी संबंधित कचरा केळगाव हद्दीतील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात तिथे टाकला जातो. त्यासंदर्भात आयुक्त ,जिल्हाधिकारी,बी,डी,ओ या अधिकाऱ्यांकडे फोटो सहित तक्रार दिलेली आहे.
तसेच आळंदी नगरपालिका व केळगाव ग्रामपंचायत यांच्यात यासंदर्भात काही दिवसांपूर्वी आळंदी नगरपालिकेत बैठक झाली आहे. येथे मोठ्या प्रमाणात कचरा केळगाव हद्दीतून येत असल्याने त्या कचऱ्यासाठी प्रक्रिया करण्यासाठी ठराविक रक्कमेसंदर्भात चर्चा त्यावेळी करण्यात आली आहे.तसेच मुख्याधिकारी यांनी एका वृत्त संस्थेला सांगितले केळगाव ग्रामपंचायतीचा कचरा आळंदी पालिका गोळा करते.मात्र त्यांच्या प्रवेशद्वारातच कचरा फेकला जाऊ नये यासाठी त्यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे.काही लोकांची मानसिकता ठीक नसल्याने याठिकाणी कचरा फेकून आळंदी पालिकेला बदनाम करण्याचे षडयंत्र रोज करत आहे.
परंतु आळंदी नगरपालिका -केळगाव ग्रामपंचायत यांच्यातील या कचऱ्या संदर्भातील वाद केव्हा सुटेल व या रस्त्यावर चालणारे नागरिक येथे स्वच्छ, दुर्गंधीमुक्त श्वास केव्हा घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परंतु या रस्त्यावरील कचऱ्यामुळे येथे आसपास राहणाऱ्या स्थानिक नागरिकांचे त्या दुर्गंधी मुळे व त्यापासून उदभवणाऱ्या रोगांमुळे आरोग्य धोक्यात आले असून त्याला जबाबदार नक्की कोण? आळंदी पालिकेवर तहसीलदार  प्रशासक म्हणून कार्यरत आहे.त्यांनीच पुढाकार घेत केळगाव  ग्रामपंचायत व आळंदी पालिकेची बैठक घेऊन योग्य ती संयुक्त जबाबदारी देणे आवश्यक बनले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.