Pimpri : पार्किंग पॉलिसीसाठी दीड वर्षानंतर सल्लागाराची नेमणूक

स्थायी समितीची मान्यता 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आणि वाहतुकीस शिस्त लावण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने निश्चित केलेल्या ‘पार्किंग पॉलिसी 2018’साठी सल्लागार नेमण्यात आला आहे. महासभेने पॉलिसीला मान्यता दिल्यानंतर तब्बल 14 महिन्यांनी सल्लागाराची नेमणूक करण्यात आली आहे.  ग्लोबल ट्रॅफिक सोल्यूशन या एजन्सीची सल्लागार म्हणून नेमणूक केली असून त्यांना 16 लाख 78 हजार रूपये शुल्क देण्यात येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली. 

पिंपरी-चिंचवड शहराची निवासी व फिरती लोकसंख्या सुमारे  27 लाखांपर्यंत पोहचली आहे. सन 2017 च्या आकडेवारीवरून शहरात तब्बल 15 लाख 68 हजार 607 वाहने असल्याची नोंद आहे. आतापर्यंत ही संख्या 18 लाखांच्या वर पोहचली आहे. त्यामुळे शहरातील प्रशस्त रस्ते ही पार्किंगसाठी अपुरे पडत आहे.

त्यावर उपाय म्हणून महापालिकेच्या बीआरटीएस विभागाने पार्किंग पॉलिसी निश्‍चित केली. त्यास स्थायी समितीने 9 जून 2018 ला तर, सर्वसाधारण सभेने 22 जून 2018 मंजुरी दिली. त्यानुसार अधिक वर्दळीच्या भागांत वाहने लावण्यासाठी तासानुसार शुल्क आकारले जाणार आहे. निवासी भागांत 24 तास वाहने लावण्यासाठी वार्षिक शुल्क घेतले जाणार आहे. दुचाकीस तासाला 2 रूपये, रिक्षाला तासाला 6 रूपये, चारचाकी, टेम्पोला 10, मीनी बसला 15, ट्रॅकला 33 आणि खासगी बसला तासाला 39 रूपये शुल्क आकारले जाणार आहे. सभेने या दरात 25 टक्के कपात सुचवून मंजुरी दिली आहे. यामध्ये सायकल, रूग्णवाहिका, दिव्यांगांची वाहने व मान्यता प्राप्त रिक्षा थांब्याकडून कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही.

महापालिकेने या पॉलिसीसाठी सल्लागाराची निविदा मागविली होती.  ग्लोबल ट्रफिक सोल्युशन या एजन्सीने लघुत्तम दर दिल्याने त्यांची निविदा प्रशासनाने मंजुर केली आहे. शहरातील एकूण 80 किलोमीटर भागातील पार्किंगच्या प्रत्येक किलोमीटरसाठी 20 हजार 975 रूपयांप्रमाणे एकूण 16 लाख 78 हजार रूपये शुल्क या सल्लागारास देण्यात येणार आहे.  याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.