Bhosari News : सहल केंद्रात उभारणार मत्स्यालय; स्थायी समितीची मान्यता

एमपीसी न्यूज – भोसरीतील सर्व्हे क्र. एक येथे उभारण्यात आलेल्या भोसरी सहल केंद्रात आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय (फिश अॅक्वारियम) दहा ते बारा हजार स्वेअर फुट जागेत उभारण्यात येणार आहे. यामध्ये 360 अंशात नागरिकांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे फिश अॅक्वारियम पाहता येईल. यासाठी सुमारे दहा कोटी रुपये खर्च अपेक्षित असून त्याच्या पहिल्या टप्प्यातील पाच कोटी दोन लाख रुपयांच्या खर्चास आज (बुधवारी) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

महापालिका स्थायी समितीची साप्ताहिक सभा आज पार पडली. या सभेतील एकूण 34 विषयांपैकी 33 विषयांना मंजूरी देण्यात आली. तसेच ऐनवेळच्या 15 विषयांना देखील 15 विषयांना अशा एकूण 47 विषयांना मंजूरी देण्यात आली. यामध्ये महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणा-या विविध विकास कामांच्या सुमारे 27 कोटी 23 लाख 74 हजार 199 रुपयांच्या खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली.

भोसरी सहल केंद्रात आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालयात शालेय विद्यार्थ्यांना व पर्यटकांना आनंद लुटता येईल. या केंद्रास दररोज हजारांहून जास्त प्रेक्षक भेट देतील यातून पर्यटन व्यवसायास चालना मिळेल आणि अनेक नविन रोजगार निर्माण होतील, असा विश्वास स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांनी व्यक्त केला. शहरामध्ये ठिकठिकाणी अतिक्रमण कारवाई सुरु आहे. महापालिका प्रशासनाने अनधिकृत बांधकाम धारकांसाठी गुंठेवारी कायद्यानुसार बांधकामे नियमित करण्याबाबत पत्रक प्रसिद्ध केले आहे. या पत्रकानुसार नागरीकांना अर्ज करण्यासाठी संधी द्यावी. तसेच जी अनधिकृत बांधकामे गुंठेवारी कायद्यानुसार नियमित होऊ शकतील ती बांधकामे आणि निवासी बांधकामे पाडू नयेत अशी सूचना स्थायी समिती सदस्यांनी आयुक्तांना केली.

महापालिका कार्यक्षेत्रातील विकसक, बांधकाम व्यावसायिक तसेच खाजगी मिळकतधारक यांची पाणीपुरवठा विषयक तसेच जलनि:सारण विषयक कामे परवानाधारक प्लंबर्स यांच्यामार्फत करण्यात येतात. त्याकरीता खाजगी प्लंबर्सना महापालिकेमार्फत परवाना देण्यात येतो. त्यासाठी परवाना धारकांना पाच वर्षाकरीता दीड हजार रुपये परवाना फी आकारण्यात येते. ही परवाना फी सन 2001 या आर्थिक वर्षापासून प्रचलित आहे. 20 वर्षाहून फी मध्ये कोणत्याही प्रकारची वाढ केलेली नसल्याने नवीन प्लंबर परवाना देण्यासंदर्भात तीन वर्षांकरीता पाच हजार रुपये फी तसेच नुतनीकरण करण्याकामी प्रतिवर्षी एक हजार रुपये फी दरवाढ करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली.

प्लंबर्स, इलेक्ट्रिशियन, सुतार अशा सेवांची नागरीकांना नेहमी गरज भासते. परंतू, प्रशिक्षित मनुष्यबळ मिळत नाही. त्यासाठी महापालिकेने क्रेडाई व पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयाशी समन्वय साधून एक पोर्टल किंवा ॲप बनवून त्याव्दारे नागरीकांना या सेवा द्याव्यात. यासाठी क्रेडाई व पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालय प्रशिक्षण देणार आहे. यातून प्रशिक्षित कारागीर ते गरजू नागरिक यांचा योग्य समन्वय साधला जाईल तसेच पाच हजारांहून जास्त कारागीरांना रोजगार उपलब्ध होईल. अशा स्वरुपाचे पोर्टल बनविण्यासाठी ऐनवेळचा विषय म्हणून मान्यता देण्यात आली.

केंद्र शासनाकडील अमृत योजनेअंतर्गत शहराच्या 60 टक्के भागामध्ये पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करण्याच्या प्रकल्पाचे काम चार निविदा पॅकेजमध्ये चालू असून या प्रकल्पांतर्गत नेटवर्क सुधारणा करुन जलवाहिनीचा दाब वाढविणे, पाण्याची उंच टाकी बांधणे, नवीन नळजोडणी करणे आणि पाणीगळती कमी करणे इत्यादी कामे करण्यात येत आहेत. यामध्ये भौगोलिक परिस्थितीत बदल, जलवाहिनीतील गळती, पाणीपुरवठ्याबाबत वारंवार होणा-या तक्रारी, विकासकामांवेळी खोदाई करताना वाहिन्यांची होणारी तुट फुट, कामांचे वाढलेले दर अशा कारणांचा समावेश आहे. त्यामुळे या खर्चात निर्धारीत रकमेपेक्षा सुमारे 11 कोटी 53 लाख रुपये अधिक खर्च होणार आहेत या खर्चासही स्थायी समितीने मान्यता दिली.

क क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील मलनि:सारण नलिका मॅनहोल चेंबर्सची सफाई आधुनिक यांत्रिकी पध्दतीने करण्यासाठी 1 कोटी 29 लाख रुपये, प्रभाग क्र. 12 तळवडे येथील बाठेवस्ती परिसरातील जुने अस्तीत्वातील रस्त्याचे खडीमुरुमीकरण आणि डांबरीकरण करण्यासाठी २20 लाख रुपये, प्रभाग क्र. 12 रुपीनगर परिसरातील सेवा वाहिन्या करीता खोदलेले चर खडी मुरुमाने भरण्याकामी 31 लाख रुपये, प्रभाग क्र. 19 मधील आंबेडकरनगर, भिमनगर, सँनिटरी चाळ आणि इतर झोपडपट्टीतील स्थापत्य विषयक कामाची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी 17 लाख रुपये, प्रभाग क्र. 28 पिंपळे सौदागर मधील शिवराज नगर आणि परिसरातील रस्त्यांचे डांबरीकरण करण्याकामी 22 लाख 81 हजार तर मनमंदीर सोसायटी परिसर आणि इतर भागातील रस्त्यांचे डांबरीकरण करण्याकामी 22 लाख 82 हजार रुपये या खर्चासही स्थायी समितीने मान्यता दिली.

तसेच प्रभाग क्र. 29 पिंपळे गुरव परिसरातील रस्त्यांवरील ट्रेंचेस आणि खड्ड्यांची हॉटमिक्स आणि कोल्डमिक्स पध्दतीने दुरुस्तीची कामे करण्यासाठी 19 लाख 76 हजार रुपये तर विविध अंतर्गत आणि मुख्य रस्त्यांचे हॉटमिक्स पध्दतीने डांबरीकरण करण्यासाठी 25 लाख 66 हजार रुपये खर्च केले जाणार असून या खर्चासही स्थायी समितीने मान्यता दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.