Chakan : चाकणमध्ये पुन्हा एटीएम फोडण्याचा प्रयत्न; एकाला अटक

एमपीसी न्यूज – चाकण परिसरात नाणेकरवाडी येथे पुन्हा एकदा एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला. ही घटना मंगळवारी (दि. 3) पहाटे घडली असून याप्रकरणी चाकण पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

राहुल कुमार रॉय (वय 32, रा. नाणेकरवाडी, ता. खेड. मूळ रा. उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी नवनाथ उत्तम कणसे (वय 37, रा. दिघी) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण परिसरात नाणेकरवाडी येथे ज्ञानराज कॉम्प्लेक्स बिल्डिंगमध्ये एचडीएफसी बँकेचे एटीएम सेंटर आहे. मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास आरोपी राहुल याने मशीनच्या समोर लॉक लावलेला दरवाजा हाताने ओढून लॉक तोडले. दरवाजाचे नुकसान करून मशीनमधून पैसे चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

चाकण परिसरात एटीएम ओढून नेल्यासह एटीएम फोडण्याच्या प्रयत्नाच्या घटना अजूनही अनडिटेक्ट आहेत. यामध्ये पोलिसांच्या हाती काहीच लागले नसल्याने आरोपी अद्याप मोकाट आहेत. वाकड पोलिसांनी अटक केलेल्या टोळीकडून आठ गुन्हे उघडकीस आले आहेत. मात्र, चाकण आणि परिसरातील गुन्हे अद्याप उघडकीस आलेले नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.