Bhosari Crime News : वाकडच्या हवालदाराला भोसरी वाहतूक विभागाच्या पोलीस शिपायाकडून गजाने मारहाण

एमपीसी न्यूज – नाकाबंदीच्या ठिकाणी हजर होण्यास सांगितल्याने वाकडच्या पोलीस हवालदाराला उद्धटपणे बोलून भोसरी वाहतूक विभागाच्या पोलीस शिपायाने लोखंडी गजाने मारहाण केली. याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (दि. 22) रात्री साडेदहा वाजता हॅरिस ब्रिज, दापोडी येथे घडली.

किसन विठोबा गराडे (वय 52) असे मारहाण झालेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलीस शिपाई सुरज जालिंदर पोवार याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलिसांकडून शहरात येणाऱ्या-जाणाऱ्या मार्गांवर नाकाबंदी लावण्यात आली आहे. जुना पुणे-मुंबई महामार्गावर दापोडी येथील हॅरिस ब्रिजवरही नाकाबंदी लावण्यात आली आहे. पोलीस हवालदार गराडे हे वाकड पोलीस ठाण्यात तर पोलीस शिपाई पोवार भोसरी वाहतूक विभागात कार्यरत आहेत. फिर्यादी पोलीस हवालदार गराडे आणि आरोपी पोलीस शिपाई पोवार यांची ड्युटी गुरुवारी (दि. 22) त्या नाकाबंदी पॉईंटवर लावण्यात आली होती.

गुरुवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास नाकाबंदीच्या ठिकाणी हजर राहण्यासाठी फिर्यादी गराडे यांनी आरोपी पोवार याला फोनवर सांगितले. त्यावरून ‘तू माझा बाप आहेस का? तू मला कोण सांगणारा?’ असे उद्धटपणे बोलून पोवार लोखंडी गज घेऊन आला. त्याने गराडे यांना गजाने मारले. यात पोलीस हवालदार गराडे जखमी झाले आहेत. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.