Bhosari : महापालिकेच्या रुग्णालयात रेबीज प्रतिबंधक औषधांचा बफर स्टॉक ठेवा – सचिन गोडांबे

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महापालिकेने रुग्णालयात रेबीज प्रतिबंधक लस उपलब्ध करावी, याबाबत सामाजिक कार्यकर्ते सचिन गोडांबे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे.

या निवेदनामध्ये त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड पालिकेच्या हद्दीतील भोसरी व इतर अनेक गावांत मोकाट कुत्र्यांचा उपद्रव सतत होत असतो. भोसरीतील दिघी रोड येथील सिद्धेश्वर शाळेजवळ अशीच मोकाट व पिसाळलेली कुत्री गेले काही दिवस शाळेत येणाऱ्या जाणाऱ्या मुलांना चावत आहेत. तेथील काही नागरिकांनी याबाबत तक्रार केली आहे. तसेच भोसरीतील पालिकेच्या हॉस्पिटलमध्ये हे बाधित नागरिक गेले असता तेथे व वायसीएममध्येही रेबीज प्रतिबंधक लस उपलब्ध नसल्याचे कळविण्यात आले.

ऱॅबीपूर ही रेबीजवरील लस मेडिकल दुकानांत 336 रु. ना उपलब्ध असून ती देण्यासाठी डॉक्टरांची तपासणी व इतर फी इ. धरुन प्रती इंजेक्शन सुमारे 500 रु. खर्च नागरिकांना करावा लागत आहे. म्हणजेच 4 इंजेक्शन सुमारे दोन हजार रु. नागरिकांना खर्च करावे लागत आहेत. मग नागरिक कर कशासाठी भरतात ?

मोकाट कुत्री पकडण्यासाठी या पूर्वीही सारथीवर तक्रारी दिल्या होत्या. त्यावर कार्यवाही होत नाही. आज पुन्हा तक्रार दिली असता तरार प्राप्त झाल्याचा मेसेज येतो. परंतु, समस्येची दखल जात नाही. अशी मोकाट व पिसाळलेली कुत्री पकडून त्यांना पुन्हा न सोडता योग्य ती पुढील कार्यवाही करण्यात यावी व इतर कुत्र्यांची नसबंदी नियमित करण्यात यावी. इतर मोकाट जनावरेही नियमित पकडण्यात यावीत अशी मागणी करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.