Bhosari: अण्णासाहेब मगर सहकारी बँकेत राजीनामा सत्र; अध्यक्षानंतर आता उपाध्यक्षाचा राजीनामा

एमपीसी न्यूज – भोसरीतील अण्णासाहेब मगर सहकारी बँकेत कर्जवाटप, आर्थिक व्यवहारामध्ये रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर बँकेतील पदाधिका-यांचे राजीनामासत्र सुरु झाले आहे. बँकेचे अध्यक्ष नंदकुमार लांडे यांनी तडकाफडकी अध्यक्ष आणि संचालकपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता उपाध्यक्ष विठ्ठल सांडभोर यांनी राजीनामा दिल्याचे समोर आले आहे.

अण्णासाहेब मगर सहकारी बँकेत कर्जवाटप, आर्थिक व्यवहारामध्ये रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच बँकेचे अध्यक्ष नंदकुमार लांडे अधिनियमाचे कलम 73 क अ (1)(एक)(क)(एक)नुसार कसूरदार ठरले असून बँकेचे संचालक राहण्यास अपात्र ठरल्याचे सकृतदर्शनी दिसून येत असल्याचा ठपका ठेवत महाराष्ट्र राज्य सहकारी संस्थेचे अप्पर निबंधक डॉ. किशोर तोष्णिवाल यांनी लांडे यांना कारणे दाखवा नोटीस बजाविली होती. तसेच 20 मार्च 2019 रोजी होणा-या सुनावणीस हजर राहण्याचे निर्देश दिले होते.

  • तत्पुर्वीच 25 फेब्रुवारी 2019 रोजी नंदकुमार लांडे यांनी अध्यक्ष आणि संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. सहकार आयुक्त व निबंधक यांना पाठविलेल्या राजीनामा पत्रात वैयक्तीक कारणामुळे अध्यक्ष व संचालक पदाचा राजीनामा देत असल्याचे लांडे यांनी म्हटले आहे. त्यांच्यानंतर आता बँकेचे विद्यमान उपाध्यक्ष विठ्ठल सांडभोर यांनी देखील उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

सांडभोर यांनी 8 मार्च 2019 रोजी राजीनामा दिला आहे. वैयक्तीक कारणामुळे राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांचा राजीनामा बँकेच्या सभेने मंजुर देखील केला आहे. पुढील कार्यवाही करण्यासाठी याबाबतची माहिती सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र, पुणे जिल्हा उपनिबंधक, सहकारी निवडणूक प्राधिकरण यांना कळविण्यात आली आहे. दरम्यान, चौकशी होण्याची चिन्हे दिसताच अध्यक्ष, उपाध्यक्षांनी राजीनामा दिले असल्याची जोरदार चर्चा भोसरी परिसरात सुरु आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.