Bhosari : भोसरी परिसरातून कारसह तीन वाहने चोरीला

एमपीसी न्यूज – भोसरी परिसरातून एक कार आणि दोन दुचाकी अशी एकूण दोन लाख 75 हजार रुपये किमतीची तीन वाहने चोरीला गेल्याचे  समोर आले आहे. याबाबत सोमवारी (दि. 18) अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिल्या प्रकरणात प्रकाश नारायण राठोड (वय 50, रा. आदर्शनगर दिघी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी राठोड यांची  अडीच लाख रुपये किंमतीची टाटा सुमो गोल्ड (एमएच 14 / एफ एक्स 6640) ही त्यांच्या कार्यालयाच्या बाजूला पार्क करून ठेवली होती. अज्ञात चोरट्यांनी त्यांची कार चोरून नेली आहे. ही घटना 17 मे रोजी सकाळी लक्ष्मी प्लाझा कासारवाडी येथे उघडकीस आली आहे.

वाहन चोरीची दुसरी घटना मारुती नगर, भोसरी येथे 23 एप्रिल रोजी उघडकीस आली आहे. या प्रकरणी चंद्रकांत ज्ञानेश्वर जाधव (वय 52) यांनी अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

फिर्यादी जाधव यांनी त्यांची 15 हजार रुपये किमतीची  दुचाकी (एमएच 14 / बीजी 3189) त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. दुचाकी चोरीला गेल्यानंतर जाधव यांनी स्वतः काही दिवस शोध घेतला. मात्र दुचाकी न मिळाल्याने त्यांनी गुन्हा नोंदवला आहे.

दुचाकी चोरीची तिसरी घटना 19 मार्च रोजी जिजामाता उड्डाणपुलाच्या खाली भोसरी येथे घडली आहे. या प्रकरणी भरत कचुभाऊ तळेकर (वय 50, रा. थिट वस्ती, खराडी, ता. हवेली) यांनी अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

फिर्यादी तळेकर यांनी त्यांची 10 हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच 12 / डीएन 3350 )भोसरी येथील जिजामाता उड्डाणपुलाच्या खाली 19 मार्च रोजी सकाळी आठच्या सुमारास पार्क केली. दिवसभरात त्यांची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. हा प्रकार सायंकाळी सहा वाजता उघडकीस आला.

तळेकर यांनी देखील स्वतः काही दिवस शोध घेतला. मात्र दुचाकी न मिळाल्याने त्यांनी पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला आहे. वरील तीनही गुन्ह्यांचा तपास भोसरी पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.