Blog by Harshal Alpe : राजकारणापायी माणुसकीची ही नाती तोडू नका रे

एमपीसी न्यूज : कोविड काळातील लॉकडाऊन, सोशल मीडिया, राजकारण आणि माणसा-माणसात निर्माण होत असलेले वादंग यामुळे समाजाचे चित्रच पालटले आहे. याच विषयावरील हर्षल अल्पे यांचा हा ब्लॉग…

————————–

आजकाल सोशल मीडिया उघडला की, कुठे न कुठे, कुणाच्या न कुणाच्यात वाद हा दिसतोच, कधी कधी तर दोन जुने मित्र, मैत्रिणी, एकमेकांचे अत्यंत निकटचे आप्तस्वकीय तावातावात भांडताना दिसतात, या भांडणात भाषेचे कुठलेच बंधन नसते, वाट्टेल ते आणि वाट्टेल तसे ते भांडत सुटलेले असतात, दोघांचा ही तोल ढळलेला असतो, तिसर्‍या वाचणार्‍या व्यक्तिला हे खूपच नकारात्मक चित्र पाहायला मिळतं, अशी होणारी भांडणं आणि ती राजकीय पक्षांवरून होणारी ही सुदृढ समाजासाठी अत्यंत क्लेश देणारी आहेत, यात शंकाच नाही…

खरंतर आदर्श लोकंशाहीत प्रत्येक नागरिकाला आपापली अशी ठोस विचारसारणी असतेच असते, विचारांच्या मांडणीला एक स्वतंत्र अशी बैठक निश्चित असते, प्रत्येकाच्या जडणघडणीने च ती समृद्ध होत गेलेली असते, मात्र आजकाल एक वेगळेच चित्र समाजासमोर येत आहे , की सोशल माध्यमांवर होत जाणारा दोन्ही प्रवाहात विचारांचा एकतर्फी मारा यामुळे, दोन व्यक्तींमध्ये होणारी सुदृढ चर्चा ही विस्कळीत होत जाते…. आणि ती दोन व्यक्तींमधली न राहता दोन समुहांची शाब्दिक हाणामारी होत जाते, बर ज्यांच्याबद्दल ही होत असते त्यांना याचे कदाचित सोयर-सूतक ही नसेल एवढे नक्की… किंवा त्यांचेच काही घटक या दोघांच्या भांडणात मुद्दे पुरवून मजा बघत बसल्याचे ही आढळते, या सगळ्या मजेत एक माणूस दुसर्‍या माणसापासून दुरावतो आणि असे होणे हे काही फार चांगले नाही….

डावी विचारसरणी आणि उजवी विचारसरणी खरंतर या दोन्ही विचारप्रणाली या माणसाच्या बौद्धिक प्रगतीशी जोडल्या गेलेल्या आहेत, मात्र आता सरसकट स्टॅम्पसारखा वापर या दोन्ही विचारसरणींचा होताना दिसतो आणि मग वरवरचीच वादावादी उरते ठोस असे असे काहीच उरत नाही…

असे व्हायला नाही पाहिजे, खरंतर नाती, मैत्री हे सर्वात महत्त्वाची देणी आहेत, जी आपल्याला माणूस म्हणून मिळालेली आहेत, माणसाची सर्वात मोठी ताकद जर काय असेल तर त्याचं सृजनशील मन आणि चाणाक्ष बुद्धी जी त्याने विवेकानेच वापरली पाहिजे ती त्याची क्षमताही आहे आणि या सृष्टीची त्याच्याकडून अपेक्षाही आहे, मात्र सद्यस्थितीत असे होताना दिसत नाही.

कोविडच्या या लॉकडाउन च्या अवघड काळात एकटेपणाच्या अस्थिर वातावरणात जेव्हा समाज माध्यमांवर हे असे चित्र दिसते तेव्हा खरच त्रास होतो, वेदना ही होते हातावरचा मळ साबणाने साफ होतो पण आमच्या मनाचे काय? तो साफ करण्यासाठी आधी या भंपक मीडिया सेलच्या भूलथापाना आणि या वरवरच्या स्टॅम्प रूपी विचारसरण्यांना तिलांजली द्यावीच लागेल, त्यानेच वैचारिक लॉकडाउन तुटून खर्‍या अर्थाने अनलॉक होणार आहे….

धन्यवाद ….

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.