Blog By Harshal Alpe : राजकारण नको, लस घ्या हो जरा !!!

एमपीसी न्यूज – सध्या लोकांना जरा राजकारणाची गोडी जरा अधि च लागलेली दिसते , लॉकडाउन मध्ये मनोरंजन किंवा अजून काही कारणांसाठी आम्ही बातम्या च बघत असू , त्यामुळेच आमची जी काही मत होती, ती या बातम्यानी अधिक च दृढ होत गेलेली दिसतात, त्यातूनच सोशल मीडियावर येणार्‍या प्रतिक्रिया आणि त्यावर आपली प्रतिक्रिया, अन् तो संघर्ष, हा त्या पानिपतावरच्या घनघोर युद्धाला ही मात देईल असा.

जिथे शब्द हेच शस्त्र आणि शिवी हे तर अणूबॉम्ब, शिवाय वैयक्तिक चारित्र्य हनन हे तर रामबाणच, जरा मुद्दा पटला नाही, की हे युद्ध सुरूच, त्यात चवीस भर म्हणून, डावी विचारसरणी आणि उजवी विचारसरणी यांचा यथेच्छ उद्धार चाललेला असतो….. या जंजाळात मूळ मुद्दाच नंतर नंतर विसरला जातो, या असल्या वाकयुद्धातून आणि शब्दांच्या भडिमारातून माणूस म्हणून असलेले नाते संबंध ही तोडले जातात, अथवा त्यात कटुता निर्माण होते.

पण प्रश्न कोरोना आणि त्याने बंद पाडलेल्या जगाचा आहे , त्या राजकीय वादांचा आणि विचारसरणी यांचा येथे खर तर काहीच संबंध नसला पाहिजे, कारण कोरोनाच्या या काळात सगळे खर तर समान पातळीवर, सगळेच घरी आणि थोड्या फार प्रमाणात आपपल्या पातळीवर कष्टी झालेले आहेत, लोकांचे रोजचे जगणे, त्यातले प्रश्न गंभीर आहेत, अशावेळी येणारा राग, होणारी चिडचिड याला वाट खर तर कुठेच मिळत नाही, सोशल माध्यमांमुळे आम्ही जवळ आलो, पण मनाचे काय? ते तर अजून ही भेदरलेलेच आहे, त्यातूनच मग कधी तरी अशाही बातम्या येतात, की हे सगळं चाललेलं खोटं आहे, एका खूप मोठ्या राजकारणाचा भाग आहे , अशा वेळी जगावं की मराव हा प्रश्न पडतो खरा , पण जगण ही खूप छान गोष्ट आहे , हे जेव्हा आपण भूतकाळातल्या सुखद आठवणी काढायला लागतो तेव्हा जाणवत …

खर तर या वर्षाच्या जानेवारी पर्यंत आपण सगळेच लसीची आतुरतेने वाट पाहत होतो , “ती लस” आली की आपले सगळे प्रश्न सुटतील, आपण फिरायला मोकळे, आयुष्याची सुवर्ण स्वप्ने आपण रंगवित होतो, त्या लसी साठी आपले वाट्टेल ते करायची तयारी होती, रांगाच्या रांगा आपल्याला दिसायला ही लागल्या होत्या, पण !!!!

लस द्यायची घोषणा झाली, आणि आपल्यापैकी काही जण लगेच गालिच्छ राजकारणाची आणि नकारात्मकतेची कास धरायला लागले, त्यात काही जणांनी घोषित केले की ही लस तर एका राजकीय पक्षाची आहे, आणि म्हणून आपण ती घेणार नाही, ती लस एका विरोधी विचारसरणीची आहे, म्हणून आपण ती घेणार नाही, त्या लसीबाबत आपल्याला गोंधळ वाटतोय म्हणून आपण ती घेणार नाही, ती लस नेत्याने घेतली तर च आपण ती घेऊ, त्या लसीत काय वापरलय ते आधी सांगा, मग आम्ही विचार करू, आम्हाला निषिद्ध असलेली गोष्ट त्यात आहे, म्हणून आम्ही ती लस घेणार नाही, काय चाललय काय हे ????

जेव्हा आमच्या देशातले शास्त्रज्ञ ज्या वेळी लस तयार करत असतील आपल्या जीवाचे पाणी पाणी करून दिवस रात्र एक करून जेव्हा ते लसीसाठी मेहनत घेत असतील , तेव्हा त्यांच्या डोक्यातही नसतील असले विचार आमच्या डोक्यात येतात कसे ??? विज्ञानाची कास धरलेले पक्षीय राजकारण खेळत नाहीत, त्यांना तेवढा वेळ ही नसतो, आणि ते खुजा विचारांनी भारलेले नसतात म्हणून ते तिथे , त्या उच्च पातळीवर असतात … त्यांच्या डोळ्या समोर फक्त एकच ध्येय असते , ते म्हणजे या जगाला या रोगा पासून बचावणे , हेच त्यांचे ध्येय आणि हाच त्यांचा ध्यास असतो , डॉक्टर ज्याच्या समोर आत्ता पेशंट आहे , तो काही हा विचार करत नाही उपचार करण्या आधी की हा कुठल्या विचार सरणी च आहे , त्याच्या साठी तो फक्त एक रुग्ण असतो, ज्याचा आजार त्याला बरा करायचा असतो ,आणि औषध बनवताना त्यात काय घातले आहे, या बाबत संशय निर्माण करण म्हणजे तर बालिश पणाचा कळस आहे …

असला काही विचार न करता, चिकित्सेपोटी ज्यांनी लस घेतली आहे, त्यांची विचारपूस करणे वेगळे आणि जास्त सयुक्तिक असेल, पण ही लस आपल्या साठीच उपलब्ध करून दिलेली आहे , अस मानून च आपण प्रत्येकाने लस घेतलीच पाहिजे, जेणे करून या कोरोंना , ज्याने आमचे विश्व च बंद पाडले अश्याला चोख प्रत्युत्तर देणे हेच आपले कर्तव्य आहे ,आणि ज्या शास्त्रज्ञांनी जीवाचे रान केले त्यांना मनोमन आपण सलाम हा केला च पाहिजे …. इतकेच ….

(सर्वांनी कुठलाही आकस न ठेवता सर्वांनीच लस घेतली पाहिजे , या साठीचा हा या सामान्याचा लेख प्रपंच)

– हर्षल अल्पे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.